दाऊदपेक्षा खतरनाक डॉन बनायचं होतं; अशा ड्रग पेडलरच्या NCBने आवळल्या मुसक्या
By पूनम अपराज | Published: February 8, 2021 06:33 PM2021-02-08T18:33:32+5:302021-02-08T18:55:09+5:30
Drug Case : ब्राहिमविरोधात मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविअन्वये खटला सुरु आहे. सध्या इब्राहिम जामिनावर बाहेर आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी मुंबईतील लोखंडवाला परिसरातून एका गँगस्टरला अटक केली आहे. तो ड्रग पेडलर देखील आहे. आरोपीचे नाव इब्राहिम मुजावर असं आहे. त्याने आपलं दुसरं नाव इब्राहिम कासकर असं ठेवलं होते. इब्राहिम कासकर हे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडीलांचे नाव आहे. इब्राहिम आपल्या मर्सिडीज कारमधून ड्रग्स सप्लाय करत असे. ती कार एनसीबीने जप्त केली आहे.
खरंतर, एनसीबीने दक्षिण मुंबईतील डोंगरी येथे तीन ठिकाणी छापे मारले. तेथे इब्राहिमला चरस या ड्रग्ससह अटक केली. एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात इब्राहिमने त्याच्याकडे सापडलेला चरस हा डोंगरातील आसिफ राजकोटवालाकडून मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने डोंगरी येथून आसिफ राजकोटवालाला अटक केली. आसिफकडून चरस देखील एनसीबीने जप्त केला.
इब्राहिम आणि आसिफ हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसाठी ड्रग्सकरिता काम करत होते. इब्राहिमविरोधात मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविअन्वये खटला सुरु आहे. सध्या इब्राहिम जामिनावर बाहेर आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की, आसिफ आणि इब्राहिम एका मोठ्या ड्रग मोड्युलचा भाग आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. इब्राहिमसाठी काम करणाऱ्या पश्चिम उपनगरातील इतर ड्रग्स पेडलर्स यांची चौकशी देखील सुरु आहे.