‘एमपीडीए’साठी ‘वाण्टेड’ रितिकला भर पावसात उचलले, जळगाव LCBची पुण्यात कारवाई
By विजय.सैतवाल | Published: July 9, 2024 12:32 AM2024-07-09T00:32:56+5:302024-07-09T00:33:12+5:30
महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात दाखल आहे गुन्हे
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्यासह मध्यप्रदेशातील गुन्ह्यांमध्ये फरार असलेला तसेच एमपीडीए कारवाईसाठी पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक डिगंबर कोल्हे (३२, रा. असोदा, ता. जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील थेरगाव येथून ताब्यात घेतले. नातेवाईकांकडे जात असतानाच भर पावसात त्याला पोलिसांनी उचलले.
जबरी चोरी, हाणामारीसह मध्यप्रदेशातील नेपानगर येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेला योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश झाले होते. तेव्हापासून तो फरार होता. या संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या. तो पुणे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी जितेंद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार जितेंद्र पाटील यांच्यासह नितीन बाविस्कर, बबन पाटील व ईश्वर पाटील यांनी योगेश याला पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथून ताब्यात घेतले.
नातेवाईक, मित्रांचा आधार
फरार असल्यापासून योगेश हा मित्र व नातेवाईकांकडे राहत होता. ७ जुलै रोजी पहाटे तो नातेवाईकांकडे जात असतानाच भरपावसामध्ये त्याला ताब्यात घेतले. त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.