प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी 'त्याने' मारला 20 लाखांच्या फोन्सवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:44 AM2023-01-16T10:44:18+5:302023-01-16T10:52:46+5:30
आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने तब्बल 105 मोबाईल चोरले. या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडमधील चाईबासा येथे एक घटना घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने तब्बल 105 मोबाईल चोरले. या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दुकानात ही चोरी झाली त्या दुकानाचे उद्घाटन महिनाभरापूर्वीच झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच चाईबासा पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह चार जणांना अटक केली.
मुलांकडून गोण्यांमध्ये लपवून ठेवलेले 97 मोबाईल जप्त करण्यात आले. 105 मोबाईल चोरणारे चारही आरोपी विद्यार्थी असून सध्या शिकत आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. चाईबासा पोलिसांना 13 जानेवारीला सकाळी चाईबासा येथील तांबो चौकात असलेल्या एका दुकानात चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली होती. येथून 105 मोबाईल चोरीला गेले आहेत.
चोरलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे दुकानदाराने सांगितले. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एसडीपीओ दिलीप खालखो यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पोलिसांच्या पथकाने 24 तासांत चारही आरोपींना पकडले. पोलिसांनी सर्वांची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आले. या घटनेत पकडलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याच्या सहा मित्रांच्या मदतीने दुकानाचे शटर तोडून 105 मोबाईल चोरले.
पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. मैत्रिणीला भेटायला जाण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. यामुळे महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या दुकानात चोरीचा कट रचला गेला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, तर दोघे अल्पवयीन आहेत. तर दोन जण फरार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"