डॉक्टर सासूच्या परवान्यावर सुनेने ‘गर्भपात’ वारसा पुढे चालवला; खळबळजनक माहिती उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:24 AM2022-01-16T08:24:03+5:302022-01-16T08:24:32+5:30
४० वर्षे जुने रुग्णालय असलेल्या कदम रुग्णालयात डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे गर्भपात शासकीय अधिकृत केंद्राचा परवाना आहे. मात्र, सून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या नावावर परवाना नाही.
वर्धा : संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या आर्वीतील गर्भपात प्रकरणात दररोज नवे रहस्य उलगडत आहे. मागील ४० वर्षांपासून गर्भपात करूनच कदम रुग्णालयाचा डोलारा सुरू असून डॉक्टर सासूच्या परवान्यावर सुनेने ‘गर्भपात’ वारसा पुढे चालवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
४० वर्षे जुने रुग्णालय असलेल्या कदम रुग्णालयात डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे गर्भपात शासकीय अधिकृत केंद्राचा परवाना आहे. मात्र, सून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या नावावर परवाना नाही. सासूच्या परवान्यावरच सुनेचा गर्भपाताचा अवैध व्यवसाय सुरू होता, असे सांगण्यात येत आहे. या दिशेने पोलीस तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा हिला अटक केली. त्यानंतर दोन परिचारिका आणि सासू डॉ. शेलेजा कदम यांनाही ताब्यात घेतले. प्रकृती खालावल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कदम रुग्णालयात अनेक वर्षांपासून अवैध गर्भपातांतून कोट्यवधींची माया जमविल्याची माहिती मिळाली.
रेखाचा पती उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर
याच रुग्णालयात मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. निरज कुमारसिंग कदम हे कंत्राटी डॉक्टर म्हणून सेवा देतात. त्यामुळे अवैध गर्भपातादरम्यान शासकीय रुग्णालयातील ‘मिजोप्राॅस्ट’चा वापर कदम हॉस्पिटलमध्ये होत तर नव्हता ना? याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत. - संबंधित वृत्त/महाराष्ट्र