वर्धा गर्भपात प्रकरण: मटका पट्टीसारखी बनवली जायची गर्भपाताची चिठ्ठी; अधिकृत रजिस्टर नावापुरते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:25 AM2022-01-17T09:25:55+5:302022-01-17T09:29:18+5:30
सांकेतिक शब्द, अवैध गर्भपाताची नोंद नाही
- नरेश डोंगरे
नागपूर : कायद्याला वेशीवर टांगून गर्भपात करणाऱ्या आर्वीतील डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपाताची नोंदच होत नव्हती. मटका (सट्टा) घेणारा जशी लावणाऱ्याला चिठ्ठी देतो, त्याचप्रमाणे सांकेतिक शब्दात अवैध गर्भपाताची एक चिठ्ठी तयार केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या अवैध गर्भपात प्रकरणाची लक्तरे ‘लोकमत’ने वेशीवर टांगल्यामुळे अनेक धक्कादायक बाबी उजेडात येत आहेत. एक म्हणजे अवैध गर्भपाताची डॉ. कदम नोंदच करत नव्हते. नोटांची गड्डी हातात पडताच डॉ. रेखा कदम कोणत्याही वयातील मुलीचे अथवा महिलेचा गर्भपात करण्यासाठी सज्ज व्हायच्या. कायद्यानुसार ज्या मुलीचे अथवा महिलेचा गर्भपात करायचा आहे, त्याची अधिकृत नोंद व्हायला पाहिजे. त्यासाठी किती पैसे आकारण्यात आले, त्याची पावतीही तयार व्हायला पाहिजे. मात्र, डॉ. कदम असे काहीही करत नव्हत्या. गल्लीबोळात सट्टापट्टीची नोंद करणारा मटका अड्डाचालक ज्याप्रकारे चिठ्ठ्या तयार करतो, तशी चिठ्ठी करून गर्भपाताचा हिशेब ठेवला जायचा. ज्या गर्भपातामुळे डॉ. कदम यांच्या पापाचा भंडाफोड झाला, त्या मुलीच्या गर्भपाताचीही रजिस्टरमध्ये नोंद नाही. पोलिसांना मटक्याच्या नोंदीसारख्या काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्या आकड्यांचा उलगडा करून घेण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.
काही आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद?
कदम हॉस्पिटलमधील पापात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यावर शिक्कामोर्तब होऊ लागले आहे.
सरकारी रुग्णालयात कार्यरत डॉ. नीरज कदम यांनी अवैध गर्भपात करण्यासाठी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नीरज आणि रेखा या आरोपी डॉक्टर दाम्पत्याला आणखी कुणी मदत केली, तेसुद्धा लवकरच पुढे येईल.