जे कुणाला जमले नाही ते वर्धा पोलिसांनी करुन दाखविले, देशात कुप्रसिद्ध असलेल्या ईराणी गॅंगचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 08:03 PM2022-05-15T20:03:28+5:302022-05-15T20:04:09+5:30

Crime News : आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

Wardha police expose notorious Iranian gang in the country | जे कुणाला जमले नाही ते वर्धा पोलिसांनी करुन दाखविले, देशात कुप्रसिद्ध असलेल्या ईराणी गॅंगचा पर्दाफाश

जे कुणाला जमले नाही ते वर्धा पोलिसांनी करुन दाखविले, देशात कुप्रसिद्ध असलेल्या ईराणी गॅंगचा पर्दाफाश

googlenewsNext

वर्धा : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या ‘इराणी’ गॅंगचा राज्यातील पोलीस विभाग शोध घेत होती. मात्र, आरोपींना पकडण्यात यश मिळत नव्हते. मात्र, वर्धा शहरात या गॅंग कडून दोन घटना घडताच वर्धा पोलीस दल ‘अॅक्टीव्ह’ झाले अन् ‘इराणी’ गॅंगच्या शोधात निघाले. आपल्या जिवाची पर्वा न करता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी आणि शहर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर ‘इराणी’ गॅंगचा पर्दाफाश केला. जे कुणाला जमले नाही अखेर ते वर्धा पोलिसांनी करुन दाखविल्याने वर्धा पोलिसांची छाती ५६ इंच फुगली, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. पोलिसांनी अटक केलेल्यात अली रजा उर्फ अली बाबा शब्बीर बेग ईराणी , शेख शाहरुख रईस रा. नायकवाडी जि. अहमदनगर, रियाज रशिद शेख रा. विहा मांडवा जि. औरंगाबाद, अविनाश लक्ष्मण गायकवाड रा. शेवगांव जि. औरंगाबाद यांचा समावेश आहे.

ईराणी टाेळीतील आरोपी हे तोतया पोलीस सांगून सामान्यांना लूटण्याचा गोरखधंदा करतात. या टोळीची नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भागात वस्ती आहे. या टोळीतील आरोपी खासगी वाहनं घेऊन नागपूरच्या उपनगरात ठिय्या देतात आणि तेथूनच इतर जिल्ह्यात जाऊन गुन्हे करतात. संपूर्ण देशात या टोळीचा शोध पोलीस घेत होते. मात्र, पोलिसांच्या गळाला ही टोळी सापडलेली नव्हती. वर्धा शहरात दोन घटनांत आरोपींनी तोतया पोलीस सांगून वृद्धांना लूटल्याने ही टोळी वर्धा पोलिसांच्या रेकॉर्डवर आली अन् पोलिसांनी लगेच दखल घेत टोळीचा पर्दाफाश करुन टोळीतील आरोपींना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता १८ रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बलात्कार प्रकरणी राजस्थानच्या मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस जयपूरमध्ये दाखल

असा देतात गुन्ह्यांना ‘अंजाम’

ईराणी टोळीतील आरोपींचा नागपूर येथील उपनगरात ठिय्या होता. ते रायपूर, मध्यप्रदेश, धुळे, शिरपूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होत होते. दाखल होताच जिल्ह्यात चोरीला अंजाम देत होते.

जिवावर उदार होऊन केली धरपकड

ईराणी टोळी ही देशात कुप्रसिद्ध आहे. या टोळीचा सर्वच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा शोध घेत होती. यापूर्वीही टोळीतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर टोळीतील आरोपींनी हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी जिवावर उदार होत आरोपींना बेड्या ठोकल्या.
 

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
ईराणी गॅंगची दहशत होती. या गॅंगचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस यंत्रणा अर्लट होती. मात्र, विदर्भात या गॅंगला पकडण्यात यश येत नव्हते. अखेर वर्धा पोलिसांनी एक रात्र श्रीरामपूर येथे राहून संपूर्ण परिसर पिंजून काढत तसेच आरोपींच्या घरांची माहिती गोळा करुन जिवाची पर्वा न करता आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पारधी गॅंग नंतर दुसऱ्या मोठ्या गॅंगला पकडण्यात पोलिसांना यश आले.

Web Title: Wardha police expose notorious Iranian gang in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.