स्वयंपाकी महिलेच्या हत्येप्रकरणी चौकीदाराला जन्मठेप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:20 AM2020-05-21T11:20:44+5:302020-05-21T11:21:22+5:30
माऊंट कारमेल स्कुल मधील चौकिदाराने (अण्णाजी तुकाराम सरदार) रागाच्या भरात स्वयंपाक बनविणारी महिला वनमाला भिमराव कांबळे (वय ४५) हिची १३ डिसेंबर २०१७ रोजी हत्या केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरापासून ५ कि़मी. अंतरावर असलेल्या माऊंट कारमेल स्कुल मधील चौकिदाराने (अण्णाजी तुकाराम सरदार) रागाच्या भरात स्वयंपाक बनविणारी महिला वनमाला भिमराव कांबळे (वय ४५) हिची १३ डिसेंबर २०१७ रोजी हत्या केली होती. या हत्येप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश शशांक मनोहर मेनजोगे यांनी २० मे रोजी दिलेल्या निकालात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सुरकंडी (ता.जि. वाशिम) येथील माऊंट कारमेल इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक तथा फादर संजय वानखडे यांच्या निवासस्थानी स्वयंपाक बनविण्यासाठी वनमाला भिमराव कांबळे (रा. काकडदाती ता.जि. वाशिम) हि महिला सन २०१६ पासुन कामाला होती . तिच्याकडे स्वयंपाक गृहाची जबाबदारी देण्यात आली होती. याच शाळेतील चौकिदार अण्णाजी तुकाराम सरदार व त्यांचा मुलगा गुणाजी सरदार हे दोघे फादर वानखडे यांच्या ‘अपरोक्ष’ निवासस्थानातील खाण्यापिण्याच्या वस्तु व इतर सामानाचा वापर करीत होते. त्यामुळे वनमाला कांबळे ही अण्णाजी व त्यांचा मुलगा गुणाजी यांना वारंवार खाण्यापिण्याची वस्तू व ईतर सामान वापरण्यासाठी मनाई करीत होती. या कारणामुळे अण्णाजी व गुणा हे दोघे वनमाला हिचा नेहमीच राग करीत असत. वनमाला हिचे नेहमीचे ‘टोकने’ अण्णाजीच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.
नेमका हा राग मनामध्ये धरून १३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी चौकिदार अण्णाजी याने वनमाला ही घराच्या बाहेर एकटीच असल्याचे पाहून तिच्या डोक्यात कुºहाड मारून तिला ठार केले होते. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तत्कालीन मुख्याध्यानक संजय वानखडे यांनी फिर्याद नोंदविली. पोलिसांनी चौकिदार अण्णाजी तुकाराम सरदार (रा. वनारशी ता.जि. अमरावती) याचेविरूध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार सुनिल अंबुलकर व पोलीस उपनिरिक्षक अशोक जायभाये यांच्या पथकाने कसोशिने तपास केला. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले शस्त्र व ईतर पुराव्याच्या आधारावर न्यायाधिश शशांक मेनजोगे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
चौकिदाराच्याच शिफारशीवर वनमाला होती कामाला !
चौकिदार अण्णाजी सरदार व वनमाला कांबळे हे दोघे नातेवाईक आहेत. फादर वानखडे यांना स्वयंपाक करण्यासाठी ‘कुक’ ची आवश्यकता होती. अण्णाजी सरदार याने वनमाला कांबळे ही माझी नातेवाईक आहे. तिला स्वयंपाक चांगला करता येतो. तीला कामावर घेण्याची शिफारस चौकिदार सरदार यानेच केली होती. कालांतराने चौकिदार व वनमाला हिच्यामध्येच खटके उडल्याने चौकिदार सरदार याने तिची हत्या केली.