टरबूज उत्पादक १५ शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 03:38 PM2023-04-12T15:38:41+5:302023-04-12T15:39:06+5:30
नदीम अनवर कुरेशी (वय ४७, रा. दिल्ली) व शिराजोद्दीन (४५, रा. जयपूर, राजस्थान) अशी या गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
- नरेंद्र खंबायत
अडावद, जि. जळगाव : अडावद (ता. चोपडा) परिसरातील टरबूज उत्पादक १५ शेतकऱ्यांची तब्बल ३५ लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दिल्ली, राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम अनवर कुरेशी (वय ४७, रा. दिल्ली) व शिराजोद्दीन (४५, रा. जयपूर, राजस्थान) अशी या गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी अडावदसह परिसरातील चांदसणी, कमळगाव, पिंप्री, वडगाव, लोणी, पंचक, धानोरा परिसरात सुमारे १५० हेक्टरवर टरबूज लागवड करण्यात आली होती. परिसरातील टरबूजची मोठी आवक लक्षात घेता दिल्ली, राजस्थान आदी ठिकाणांहून टरबूज खरेदी करण्यासाठी व्यापारी आले. सुरुवातीला रोखीने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. नंतर ते शेतकऱ्यांना थोडी-थोडी रक्कम देऊन टरबूज खरेदी करू लागले. नंतर या व्यापाऱ्यांनी उधारीवर तब्बल ३५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे टरबूज खरेदी केले.
त्यानंतर व्यापारी संपर्काबाहेर गेले. व्यापाऱ्यांशी संपर्क होत नसल्याचे शेतकरी बांधवांच्या लक्षात आले. समाधान धनगर (रा. कमळगाव) यासह १५ शेतकऱ्यांनी अडावद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नदीम कुरेशी व शिराजोद्दीन यांच्याविरुद्ध अडावद (ता. चोपडा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.