....अशी झाली होती कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:35 PM2018-08-28T12:35:19+5:302018-08-28T12:40:20+5:30
कुरेशी यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी इम्रान मेहदीसह सात जणांना १० मार्च २०१२ ला पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे आसेफिया कॉलनीतून ४ मार्च २०१२ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास अपहरण झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. कुरेशी यांचा शोध लागावा, यासाठी त्यांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी पोलिसांवर दबाव वाढविला होता. पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने तत्कालीन गुन्हे शाखा पोलिसांनी १० मार्च कुरेशी यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी इम्रान मेहदीसह सात जणांना अटक केली.
११ मार्च २०१२ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत इम्रान मेहदीसह सात जणांना अटक केल्याचे जाहीर केले होते. या प्रकरणात आपले नाव येऊ नये, यासाठी इम्रानने बरीच खबरदारी घेतली होती. मात्र सायबर क्राईम सेलच्या मदतीने पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर एकापाठोपाठ त्याच्या सात साथीदारांना अटक केली. कुरेशी यांनी मेहदीला तलवार दाखवून ललकारले होते. तेव्हापासून मेहदीने कुरेशी यांना संपविण्याचा कट रचला होता. त्यानंतर त्याने आणखी आठ साथीदार जमा केले आणि कुरेशी हे व्याजाने पैसे देतात आणि गरिबांची घरे बळकावतात, यामुळे त्यांचा काटा काढायचा असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या मदतीने त्याने ४ मार्च रोजी रात्री कुरेशी यांचे अपहरण केले आणि त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले होते. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली देऊन केलेल्या पाच खुनांची माहिती दिली आणि घटनास्थळही दाखविले होते.
इम्रानही एकदा वाचला
२९ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा न्यायालयाच्या आवारात सुनावणीच्या वेळी इम्रान मेहदीचे साथीदार आणि सलीम कुरेशी समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यावेळी इम्रान हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला होता.
पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करायचा
मेहदी हा पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करायचा. २००९ साली गावठी पिस्टल विक्री करताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. याबाबतची माहिती शेख नासेर यानेच पोलिसांना दिल्याचा राग मनात धरून त्याने नासेरचाही गळा आवळून खून केला होता.
निकालामुळे कर्तव्यपूर्तीचे समाधान
पाच खुनांपैकी दोन खुनांचा निकाल आज जाहीर झाला. यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड न्यायालयाने ठोठावला. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला. या निकालामुळे कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटते. सलीम कुरेशी यांच्या हत्येशिवाय अन्य खून हे एक ते दीड वर्ष जुने होते. असे असताना एसआयटीतील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत बारकाईने तपास करून पुरावे मिळविले होते. सरकारी वकिलांनीही पोलिसांची बाजू उत्कृष्टपणे न्यायालयासमोर सादर केल्याने आरोपींना शिक्षा झाली. तत्कालीन पोलीस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त जय जाधव यांचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले.
- संदीप भाजीभाकरे, तत्कालीन एसआयटी प्रमुख व सहायक पोलीस आयुक्त
सलीम कुरेशी अपहरण ते शिक्षेचा घटनाक्रम
- ४ मार्च २०१२ रोजी रात्री दीड वाजता आसेफिया कॉलनीतून सलीम कुरेशी यांचे आरोपींनी एका वाहनातून अपहरण केले. त्यानंतर कुरेशी यांना त्यांनी भावसिंगपुरा शिवारातील कासंबरी दर्ग्यापासून पुढे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी नेऊन लिंबाच्या झाडाला बांधून क्रूरपणे छळ केल्यानंतर गळा कापून खून केला आणि खड्डा खोदून पुरून टाकले.
- ६ मार्च २०१२ रोजी कुरेशी यांची कार बेवारस अवस्थेत जिल्हा कोर्टासमोर आढळली.
- ११ मार्च २०१२ रोजी आरोपी इम्रान मेहदी ऊर्फ दिलावरसह सात जणांना अटक केल्याची माहिती तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- तपासासाठी एसआयटी स्थापन - तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या एसआयटीमध्ये तत्कालीन उपायुक्त जय जाधव, सहायक आयुक्त संदीप भाजीभाकरे, निरीक्षक रामेश्वर थोरात, अविनाश आघाव, गौतम पातारे यांचा समावेश होता. पथकाने इम्रान मेहदीने केलेल्या पाच खुनांचा उलगडा केला. विशेष म्हणजे यातील तत्कालीन पोलीस आयुक्तांचा वाहनचालक गजानन म्हात्रे यांच्याकडून सुपारी घेऊन म्हात्रेची पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचे समोर आले होते. शिवाय शेख नासेर शेख चाँद आणि अन्य एका बिल्डरच्या खुनाचा यात समावेश आहे.
- २५ आॅगस्ट २०१२ रोजी -आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त के. एम. बहुरे यांच्याकडे सोपविण्यात आला.
- सहा वर्षांपासून आरोपी जेलमध्ये
- आरोपींना २६ आॅगस्ट २०१२ रोजी मोक्का लावण्यात आला. त्यानंतर त्यांच्या खटल्याची सुनावणी मोक्का न्यायालयात सुरू होती. सहा वर्षे सुनावणी झाल्यानंतर आरोपींना आज शिक्षा झाली.
सलीम कुरेशी यांच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर दि. १३ मार्च २0१२ रोजी प्रसिद्ध झालेले लोकमतमधील वृत्त :