'आम्हाला गुन्हेगारी जग सोडायचं आहे', गळ्यात फलक लावून पोलिसांसमोर आले गंभीर गुन्ह्यातील आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:26 PM2022-06-22T15:26:55+5:302022-06-22T15:27:39+5:30
या दोघांवर हत्या, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
बुलंदशहर: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांविरोधात कडक पाऊले उचलताना दिसतात. त्याच्या या भीतीने राज्यातील अनेक गुन्हेगार स्वतःहून आत्मसमर्पण करत आहेत. यातच बुलंदशहर येथील पोलिस ठाण्यात दोन गुन्हेगार गळ्यात आत्मसमर्पणाचा फलक लावून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले.
मिळालेल्या माहतीनुसार, शाहरुख आणि अतिक अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, तेव्हा दोघांच्या गळ्यात एक फलक लटकत होते, ज्यात ‘आम्हाला गुन्हेगारीचे जग सोडून मुख्य प्रवाहात यायचे आहे,’ असे लिहिले होते. दोघेही पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करताना पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. बुलंदशहर शहराचे एसपी सुरेंद्र नाथ यांनी सांगितले की, दोघांवर खून, दरोडा आदी गंभीर गुन्हे नोंद आहेत.
17 जूनला या लोकांनी एक घटना घडवली होती, त्यानंतर 19 जूनला पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला पकडले. मात्र दुसऱ्या आरोपीने काही साथीदारांसह त्याची पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला. पोलीस या दोघांचा शोध घेत असतानाच दोघेही आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. दोघांनी शरणागती पत्करली असून, त्यांना न्यायालयात हजर करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.