Narayan Rane: अमित शहांना फोन केल्यावर आम्हाला सोडले; नारायण राणेंची पोलिसांकडून ९ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 06:46 AM2022-03-06T06:46:25+5:302022-03-06T06:46:39+5:30
Narayan Rane, Nitesh Rane in Disha Salian Case: राणे हे शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांचे पुत्र नीतेश हे स्वतः गाडी चालवत वडिलांना त्या ठिकाणी घेऊन आले. त्यावेळी शेकडो राणेसमर्थक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमदार मुलगा नीतेश राणे यांचा सहभाग असलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत दिशा सालीयनबाबत वक्तव्य करीत शिवसेनेवर हल्लाबोल करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र नीतेश यांची मालवणी पोलिसांनी शनिवारी नऊ तास चौकशी केली. दिशाच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर राणेंवर दखलपात्र गुन्हा नोंदविला.
राणे हे शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांचे पुत्र नीतेश हे स्वतः गाडी चालवत वडिलांना त्या ठिकाणी घेऊन आले. त्यावेळी शेकडो राणेसमर्थक उपस्थित होते. राणे पितापुत्रासोबत त्यांचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे तसेच अंगरक्षक आणि कमांडोदेखील होते. मालवणी पोलीस ठाण्याच्या तिसऱ्या मजल्यावर राणे आणि नीतेश यांना नेण्यात आले. प्रसिद्धीमाध्यमांची मोठी गर्दी त्या ठिकाणी होती. साध्या वेशातील पोलीसही त्या ठिकाणी नजर ठेवून होते; तर भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांचा घोळका एका बाजूला जमा झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
राणे यांचा जबाब घेण्यासाठी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर तसेच क्राइमचे पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी त्या ठिकाणी हजर होते. त्यानुसार तब्बल
नऊ तास चौकशी सुरू होती.
राणे रात्री १० नंतर बाहेर आले. बाहेर असलेल्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते; तर पोलीस हे विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप मानेशिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
महापौर किशोरी पेडणेकर दिशाच्या घरी गेल्या आणि त्यांनी पालकांना तक्रार करण्यास भाग पाडले. पोलिसांनी आमची चौकशी केली. मी अमित शहा यांना फोन केला. सगळी माहिती दिली. दिशाची हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दोनवेळा फोन आला. ते म्हणाले, तुम्ही याप्रकरणात बोलू नका. पण दिशाच्या हत्येबद्दल आम्ही बोलत राहणार. - नारायण राणे, केंद्रीय मंत्री