"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 05:41 PM2024-10-05T17:41:35+5:302024-10-05T17:42:45+5:30
शाळेतून परतणाऱ्या आठवीच्या दोन विद्यार्थिनींचा भरदिवसा विनयभंग करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील देवरिया येथे घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी आणि भीतीदायक आहे. शाळेतून परतणाऱ्या आठवीच्या दोन विद्यार्थिनींचा भरदिवसा विनयभंग करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बाईकवरून आलेले चार गुंड विद्यार्थिनींचा पाठलाग करत होते. यावेळी घाबरलेल्या विद्यार्थिनींनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विद्यार्थिनींनी अंगावर काटा आणणारा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे. दोन्ही मुली शाळेत परीक्षा देऊन परतत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. विद्यार्थिनींनी सांगितलं की, आम्ही परीक्षा देऊन येत होतो. त्याचवेळी रस्त्यावर गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला. चार गुंड आमच्या मागे लागले. आम्ही खूप आरडाओरडा केल्यावर ते पळून गेले. पप्पा आम्हाला वाचवा असं आम्ही ओरडत होतो. आम्ही त्या लोकांना ओळखत नाही.
शुक्रवारी ही घटना घडली. तरकुलवा भागातील नारायणपूर भागात बांधलेल्या शाळेत आठवीच्या वर्गातील दोन विद्यार्थिनी सायकलवरून शाळेत जातात. त्या दिवशी दोघींच्या परीक्षा होती. परीक्षा संपल्यानंतर दोन्ही मुली घरी परतण्यासाठी निघाल्या. या मुलींनी घरी जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर केला त्या मार्गावर शेती आहे. दोघीही शाळेतून निघाल्या तेव्हा जवळपास ६०० मीटर अंतरावर पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत भयंकर प्रकार घडला.
बाईकवरून येणारे चार जण मुलींचा पाठलाग करत होते. चारही गुंड मुलींना घेरून त्यांचा विनयभंग करतात. त्यामुळे मुली सायकलवरून खाली पडतात. काही गुंड एका मुलीला शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. मुली ओरडू लागतात. यावेळी आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत येतात. लोकांना पाहताच गुंड बाईकवरून पळून जातात.
काही अंतरावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेबाबत कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी सांगितलं की, आरोपी बाईकवर होते, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्यास सांगितलं आहे. जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.