इयर फोन घालून रिक्षा सुसाट चालवली अन् तरुणीने मारली धावत्या रिक्षातून उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:03 PM2019-10-07T15:03:51+5:302019-10-07T15:09:25+5:30
जखमी तरुणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई - रिक्षाचालकाने कानात घातलेल्या इयर फोनमुळे रिक्षेतून प्रवास करणाऱ्या प्रवासी मुलीने भीतीने धावत्या रिक्षातून उडी मारली. या धक्कादायक घटनेमुळे तरुणी जखमी झाली आहे. कानात इयर फोन असल्याने रिक्षाचालक तरुणीचा आवाज न ऐकताच रिक्षाचालक सुसाट रिक्षा चालवत होता. त्यामुळे रिक्षाचालकाला घाबरून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घोडबंदर रोडवर घडला. याप्रकरणी रिक्षाचालक कामरान खान (22) याला कासारवडवली पोलिसांनीअटक केली आहे.
घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरात पीडित तरुणी राहते. शाळा सुटल्यानंतर ती कासारवडवली येथून तिच्या मैत्रिणीसह रिक्षात बसली. रिक्षा भाईंदरपाडा येथे आली असता पीडित तरुणीच्या मैत्रिणीला रिक्षातून उतरायचे होते. त्यासाठी तिने रिक्षाचालक कामरान याला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र, त्याने रिक्षा न थांबवता सुसाट वेगाने पुढे नेली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्यावर अतिप्रसंग होऊ नये म्हणून प्रसंगावधान दाखवत धावत्या रिक्षामधून उडी मारली. यामध्ये तिच्या हाताला आणि चेहऱ्याला मार लागला आहे. जखमी तरुणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.