लैंगिक समस्या निराकरणासाठी आलेल्या रुग्णांकडून विणले देहव्यापाराचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:41 AM2021-01-24T10:41:15+5:302021-01-24T10:45:28+5:30
Sex Racket News रुग्णांना देहव्यापाराच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून या सेक्स रॅकेटची पाळेमुळे राेवल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
अकाेला : सिव्हील लाईन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जीएमडी मार्केटसमाेर तेजस्वी हेल्थ क्लिनिकचा संचालक डाॅ. प्रदीप देशमुख याने लैंगिक समस्या निराकरण करण्याच्या नावाखाली आलेल्या रुग्णांना देहव्यापाराच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून या सेक्स रॅकेटची पाळेमुळे राेवल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. या रुग्णांच्या माध्यमातूनच ग्राहकांचे जाळे विणत हा गाेरखधंदा गत अनेक महिन्यांपासून त्याने रात्रंदिवस सुरू केला हाेता.
शहरातील उच्चभ्रू वस्तीत तेजस्वी हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली डाॅ. प्रदीप देशमुख हा देहव्यापार अड्डा चालवीत असताना शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवाद विराेधी पथकाने छापा टाकून या देहव्यापार अड्ड्याच भांडाफाेड केला. यावेळी शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्यासह त्यांचे पथकही कारवाईसाठी उपस्थित हाेते. डाॅ. प्रदीप देशमुख, एक महिला व संतोष सानप, रतन लोखंडे या चार जणांना अटक केली. त्यांची पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता डाॅ. देशमुख हा लैंगिक समस्या निराकरण करण्याच्या नावाखाली रुग्णांना विविध आमिषे दाखवायचा. त्यानंतर विविध मुलींना त्यांच्यावर उपचार करण्याचा देखावा करून त्यांना आकर्षित करायचा. रुग्ण आकर्षित झाल्यानंतर त्यांना त्याच ठिकाणी मुली पुरविण्याचे काम डाॅक्टरने सुरू केले हाेते. त्यानंतर याच रुग्णांच्या माध्यमातून माेठ्या आणि श्रीमंत ग्राहकांनाही त्यांनी या देहव्यापार अड्ड्याच्या जाळ्यात ओढत लाखाेंची माया गाेळा केली. मात्र या प्रकाराच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्यानंतर दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून या देहव्यापार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध सिव्हील लाईन्स पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी काही आराेपी वाढण्याची शक्यता आहे.
मसाज करण्यासाठी ठेवल्या सुंदर मुली
डाॅ. प्रदीप देशमुख याने याच क्लिनिकमध्ये मसाज सेंटरही सुरू केले हाेते. या मसाज सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी सुंदर मुली ठेवल्या हाेत्या. त्यामुळे कमी कालावधीतच हे मसाज सेंटर चांगलेच कुप्रसिद्ध झाले. येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्याही माेठ्या प्रमाणात झाल्याने येथे सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचे समाेर आले. त्यामुळे पाेलीस अधीक्षकांसह माेठ्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्यानंतर दहशतवाद विराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी छापेमारी करीत कारवाई केली.
सीडीआरमध्ये येणार अनेक नावे
या प्रकरणाचा तपास पाेलीस करीत असून आणखी काही बडे नावे समाेर येण्याची शक्यता आहे. डाॅ. प्रदीप देशमुख याच्या संपर्कात आणखी किती जण हाेते, याचाही सीडीआरच्या माध्यमातून शाेध घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांचे खरे चेहरे आता समाेर येण्याची शक्यता आहे.