७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 07:06 AM2020-07-10T07:06:11+5:302020-07-10T07:06:18+5:30

इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच.

Wedding at the age of 70 expensive to senior citizen, bridal Absconding with jewelry, house documents | ७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार

७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे
मुंबई : पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणाला कंटाळून तसेच आजारपणात सोबत हक्काची व्यक्ती हवी म्हणून वयाच्या ७० वर्षी एका आजोबांनी पुनश्च हरिओम करण्याचे ठरवले. आयुष्यावर आलेल्या एकटेपणाच्या लॉकडाऊनचे मळभ दूर करण्यासाठी आजोबांनी मित्राच्या मदतीने लग्नही जुळवले. परंतु, लग्नाच्या बेडीचे कायदेशीर सोपस्कार होण्याआधीच ४४ वर्षीय वधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन पोबारा केला.

इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच.
मूळचे राजस्थानचे असलेले आजोबा उत्तर मुंबईत राहतात. २०१८ मध्ये त्यांच्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने आजोबा निराधार झाले. हृदयाचा, फुप्फुसाचा व किडनीचा आजार असल्याने त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत होते. नातेवाईक दूर राहत असल्याने त्यांचीही काही मदत होत नव्हती. म्हणून मग मित्राच्या सल्ल्याने पुन्हा लग्न करण्याचे आजोबांनी ठरवले.

त्याच्याच ओळखीतून जयपूर येथील ४४ वर्षीय घटस्फोटित महिलेचे स्थळ आले. आजोबांना स्थळ पसंत पडले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ती महिला आईवडिलांसोबत घरी आली. मित्राने लगोलग लग्न उरकण्यास सांगितले. दुसºयाच दिवशी त्यांनी विवाह कार्यालय गाठले. तेथे काही कारणास्तव हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला नाही. फक्त औपचारिकता पूर्ण करण्यात आली. राजस्थानात जाऊन कायदेशीर पद्धतीने विवाह करण्याचे ठरले. मग जीवाची मुंबई करायची म्हणून ते सगळे आजोबांच्या घरात थांबले. आजोबांनी चाव्या त्या बार्इंच्या हाती सोपवल्या. पुढे राजस्थानला जाऊन विवाह नोंदणीसाठी अर्ज केला. महिनाभराने त्या महिलेने आजोबांच्या गावी येत सर्व मालमत्ता पाहून घेतली.

येथे मुंबईला परतलेल्या आजोबांना मालमत्तेची कागदपत्रे गायब असल्याचे लक्षात आले. अधिक शोधाशोध केली तर दीड लाख रुपये, लाखोंचे दागिनेही गायब झाल्याचे समजले. आजोबांनी चौकशीसाठी त्या महिलेला फोन केला. मात्र त्या बार्इंनी फोन घेतला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची आजोबांची खात्री झाली. त्यांनी लगोलग पोलिसांकडे तक्रार केली.

गुन्हा दाखल
गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात ही फसवणूक झाली. पोलिसांनी या मंगळवारी गुन्हा दाखल केला. दीड लाख रुपयांसह दागिने आणि घराची कागदपत्रे असे एकूण २८ लाख २९ हजार रुपयांवर महिलेने डल्ला मारला. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकड़ूनच अपेक्षा पोलिसांकड़ून तपास सुरू आहे. लवकरच कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करत आजोबांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.

Web Title: Wedding at the age of 70 expensive to senior citizen, bridal Absconding with jewelry, house documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.