लग्न लागण्यापूर्वीच नवरीचे १६ लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 04:53 PM2021-02-16T16:53:11+5:302021-02-16T16:54:03+5:30
Jwellery Stolen : हॉटेल कमल पॅराडाईजमधील घटना : संशयित सीसीटीव्हीत कैद
जळगाव : लग्न घटीका जवळ आली असतानाच मावशीजवळ सांभाळायला दिलेले नवरीचे १४ लाखाचे दागिने व अडीच लाखाची रोकड असा साडे सोळा लाख रुपयांचा ऐवज अवघ्या १५ मिनिटात चोरट्यांनी लांबविल्याची घटना भुसावळ रस्त्यावरील हॉटेल कमल पॅरेडाईज येथे सोमवारी दुपारी घडली. संशयित एक पुरुष व दोन लहान मुले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथील शेतकरी युवराज विश्वनाथ नेमाडे (वय ५३) यांच्या मुलीचे लग्नभुसावळ रोडवरील हॉटेल कमल परेडाईज येथे १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांचे नातेवाईकांसह आणि परिवारासह लग्नाला आलेले होते. नवरी मुलीचे सर्व दागीने तिच्या मावशीकडे संभाळायला ठेवण्यात आले होते. दुपारी १.४३ ते २ वाजेच्या सभागृहात एक व्यक्ती आणि दोन लहान मुलांनी लग्न समारंभात वऱ्हाडी व्यस्त असतांना पिशवीतून अडीच लाख रूपयांची रोकड, १ लाख रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची दोन चैन, ५५ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी, ५५ हजार रूपये किंमतीची १ तोळ्याची सोन्याची चैन, ४ लाख रूपये किंमतीचा सोन्याचा हारसेट त्यात कानातील रिंगा, अंगठी, ब्रेसलेट, ४२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ४ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुमके, ४२ हजार रूपये किंमतीचा सोन्याची गॅम वजनाची बिंदी, ४२ हजार रूपये किंमतीची ८ ग्रॅम वजनाचे कानातील लोमटे, १ लाख १२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मोराचे पॅन्डल असलेले पैडल असा एकुण १६ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.