अक्षता पडणार तोच नवरीचा प्रियकराने घातला धुमाकूळ, नवरदेव गेला परत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 05:53 PM2021-01-18T17:53:42+5:302021-01-18T17:54:28+5:30
Crime News : जुना उमरसरा परिसरातील घटना
यवतमाळ : आई-वडिलांच्या पसंतीने मुला-मुलीचे लग्न जुळविण्यात आले. लग्नाचा मुहूर्त ठरला. रविवारी सायंकाळी जुना उमरसरा परिसरातील यशोधरा मराठी शाळेत लग्न सोहळा सुरू झाला. दोन्ही बाजूंकडील मंडळी उत्साहाने आशीर्वाद देण्यासाठी जमली. नववधूवरांच्या डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षता पडणार तोच नवरीचा प्रियकर तेथे दाखल झाला. अचानक काय घडतेय हे वऱ्हाडी मंडळीच्या लक्षात आले नाही. एकच गोंधळ उडाला.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील नवरदेव आपल्या वऱ्हाडासह वधू मंडपात दाखल झाला. मुलगीही आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करण्यास तयार होती. लग्नविधी सुरू असतानाच मुलीचा प्रियकर तेथे आला. त्याने माझे हिच्यावर प्रेम आहे, मीच हिच्याशी लग्न करणार असे म्हणत नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींना धमकावणे सुरू केले. हा गोंधळ सुरू झाल्याचे पाहून नवरदेवाने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. लग्नातील भेटवस्तूसह इतर कुठलेच साहित्य न घेता आम्ही वरात घेऊन परत जात असल्याचा अर्ज पोलिसांना दिला.
हा धक्का सहन न झाल्याने नववधूची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात जन्माचे ऋणानुबंध जुळत असतानाच क्षणार्धात ते तुटले. वधू पित्यालाही या प्रकाराने नेमके काय होतेय हे कळले नाही. नवरदेवाकडील मंडळींच्या हातापाया जोडूनही ते थांबण्यास तयार नव्हते. गोंधळ घालून तो प्रियकर तेथून निघून गेला. वधू पित्यानेही पोलिसात अर्ज दिला आहे. या दोन्ही अर्जाची चौकशी अवधूतवाडी पोलीस करीत आहेत. प्रियकराच्या अचानक झालेल्या एन्ट्रीने लग्न सोहळा थांबवावा लागला.
प्रियकर नात्यातीलच
नववधूच्या नात्यातीलच प्रियकर असल्याचे सांगितले जाते. त्याची समजूत काढूनही तो मानण्यास तयार नव्हता. अखेर वराकडील मंडळींनी लग्नमंडपातून काढता पाय घेतला.