सुपारी फुटली...लग्नाची तारीख ठरली अन् आयफोनची मागणी झाली!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:13 PM2021-09-05T22:13:31+5:302021-09-05T22:14:03+5:30
पाच जणांवर गुन्हा; फलटण तालुक्यातील घटना.
सातारा : मुला मुलीची पसंती झाल्यानंतर सुपारी फोडण्यात आली. त्यानंतर लग्नाचीही तारीख ठरविण्यात आली. पण पुढे विवाह होण्यापूर्वीच आयफोन, सोन्याच्या अंगठीची मागणी झाली. तरी सुद्धा वधूपक्षाने तब्बल सात लाखांची खरेदी केल्यानंतर अचानक विवाहास मुलाकडून नकार आला. या घटनेमुळे व्यतीत झालेल्या मुलीच्या वडिलांनी लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
भूषण भरत धुमाळ, भरत गोविंद धुमाळ, सागर भरत धुमाळ, जानकीबाइ सागर धुमाळ, सुमन धुमाळ (सर्व रा. सोनके, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका युवतीचा विवाह सोनके, ता. कोरेगाव येथील एका युवकाशी ठरला. तांबवे, ता.फलटण येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात २१ जानेवारी २०२१ रोजी सुपारी फोडण्यात आली. याचवेळी २२ एप्रिल २०२१ रोजी विवाहाची तारीखही निश्चित करण्यात आली.
त्यानंतर काही ना काही कारण काढून मुलीच्या वडिलांकडे सोन्याची अंगठी, सोन्याचे दागिने, तसेच पैशाची व आयफोनची मागणी झाली. त्यांच्या मागणीनुसार मुलीच्या वडिलांनी तब्बल सात लाखांची खरेदीही केली. परंतु विवाहाची तारीख उलटून गेली तरी संबंधितांनी लग्नास टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन आमच्या मुलीची फसवणूक करून मुलीबद्दल समाजात आमची बदनामी व मानहानी केली, अशी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास हवादार डी.एम. दीघे हे करत आहेत.