तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत
By अझहर शेख | Published: July 11, 2024 12:35 AM2024-07-11T00:35:26+5:302024-07-11T00:36:15+5:30
ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्या मागील काही महिन्यांपासून शिंदेसेनेत नाहीत
अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: तेलंगणा राज्यात जूनमध्ये अमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात पंचवटी पेठफाटा परिसरातून संशयित लक्ष्मी ताठे व त्यांचा मूलगा विकास ताठे हिला तेलंगणाच्या वारंगल आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी (दि. १०) अटक केली. पंचवटी पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली. दुपारी तेलंगणा पोलिस या मायलेकाला घेऊन पंचवटीतून रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शिंदेंसेनेत त्या मागील काही महिन्यांपासून नाहीत.
अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना तेलंगणा राज्याच्या वारंगल पोलिसआयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिसांनी गांजाच्या तस्करी प्रकरणात नाशिकच्या पंचवटी भागात बुधवारी कारवाई केली. दामेरा पोलिसांचे पथक पंचवटीत आले होते. पंचवटी पोलिसांना त्यांनी कारवाईबाबत माहिती देऊन एक पथक सोबत घेत संशयित ताठे मायलेकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पंचवटी भौलीस ठाण्यात नोंद करत पथक दामेराकडे रवाना झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दामेरा पोलिसांनी ८ जून २०२४ रोजी त्या भागात १९० किलो गांजा पकडला होता.
या प्रकरणात बीड, अहमदनगर येथून दोन तस्करांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हा गांजाचा साठा नाशिकच्या पंचवटी भागात या ताठे नामक महिलेकडे पोहोच केला आणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन लक्ष्मी व विकास या दोघांना ताब्यात घेतले. यापूर्वीही २०१८ व २०१९ साली नाशिकमध्ये गुन्हे शाखांच्या पथकांनी गांजा तस्करीमध्ये लक्ष्मी ताठे व अन्य संशयितांना अटक केली होती.
...तेव्हा गुदामातून ६९० किलो गांजा केला होता जप्त
२०१८ साली औरंगाबादरोडवरील एका संशयास्पद गुदामावर छापा टाकून नाशिकच्या गुन्हे शाखेने तब्बल ३४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ६९० किलो गांजा हस्तगत केला होता. है गोदामदेखील ताठे हिच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. यावेळी तिचा जावई संशयित सुमित बोराळे व त्याचा साथीदार सुरेश महाले, लक्ष्मी हाते यांना अटक करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत थेट ओडिसापर्यंत धागेदोरे शोधून कावत तेथील संशयित अकबर खान या मुख्य पुरवठादाराच्याही मुसक्या बांधल्या होत्या, तसेच जळगावच्या पारोळा येथूनही सुरेश बेलदार, सुखदेव पवार आणि सिन्नरमधून संतोष गोळे या संशयितांना अटक केली होती.