आठवडा बाजार... फेरीवाले अन् हप्तेगिरी; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 05:48 PM2022-01-24T17:48:27+5:302022-01-24T17:48:48+5:30
Crime News : कल्याणमधील आठवडा बाजाराचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. एका महिलेने याबद्दल मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.
- मयुरी चव्हाण
कल्याण : शहरात सुरू असलेले आठवडा बाजार, फेरीवाले आणि त्यामागे दडलेलं अर्थकारण या सर्व गोष्टींची कुजबुज नेहमी सुरू असते. फेरीवाले आणि पालिका कर्मचारी यांच्यात होणारे वाद, कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले या घटना समोर आल्या की एकूणच यामागे सुरू असलेल्या अर्थकारणाबाबत सामान्य नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटतात. आता कल्याणमधील आठवडा बाजाराचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. एका महिलेने याबद्दल मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात एका माजी नगरसेवकाच्या नावाचाही समावेश आहे. संजय, नरेश, मामा, रोहन आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर हप्ताखोरीचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण पूर्व येथील आडीवली परिसरात आठवडा बाजार बंद असला की स्टॉल लावले जातात आणि स्टॉलधारकांकडून पैसे घेतले जातात असा आरोप करण्यात आला आहे.
दोन जण माझ्याकडे पैसे मागायला आले, मात्र आज धंदा झाला नसल्याने मी पैसे देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर जबरदस्तीने पैसे मागण्यात आले अे या तक्रारदार महिलेचे म्हणणे असून हे दोघेही माजी नगरसेवकाच्या ऑफिसमधील आहेत, असाही आरोप करण्यात आला आहे. मात्र माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी हा आरोप फेटाळला असून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले आहे.
राजकीय खेळी करून मला फसवल्याचा प्रयत्न असून माझ्या एका प्रकरणामधील आरोपीला जामीन मिळाला आहे. मी याप्रकरणी पुन्हा कोर्टात धाव घेतल्याने हा सगळा डाव आखण्यात आला आहे. पोलिसांनी याची नीट चौकशी करावी आणि न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी दिली आहे.