बँकेत पैसे भरण्यास गेला अन पळून गेला; बुलेट गाडी, रोख रकमेसह नोकराने ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 07:58 PM2022-08-02T19:58:33+5:302022-08-02T19:59:18+5:30
Crime News : करण महादेव मुंडे (रा. चिखलबीड, ता. वडवणी) असे आरोपीचे नाव आहे.
बीड: बँके रोख रक्कम भरण्यास गेलेल्या नोकराने रोख ३ लाख २५ हजार रुपयांसह बुलेट गाडी घेऊन पळून गेल्याचा प्रकार बीड शहरात घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण महादेव मुंडे (रा. चिखलबीड, ता. वडवणी) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील गणेश मैड यांच्या ज्वेलरी दुकानावर करण मुंडे हा मागील तीन आठवड्यापासून कामाला होता. मैड यांची व्टिंकलींग स्टार स्कुल नावाची तीन ठिकाणी शाळा आहे. सदरील शाळांची ट्युशन फी व इतर माध्यमातून प्राप्त होणारी रक्कम वैद्यनाथ बँकेत जमा केली जाते. दरम्यान, २७ जुलै रोजी शाळेची ३ लाख २५ हजार रुपयांची रक्कम काही कारणास्तव बँकेत भरता आली नसल्याने शाळेचे लिपीक महादेव येळवे यांनी ही रक्कम मैड यांच्याकडे दिली.
त्याच्या दुसऱ्या दिवशी मैड यांनी ३ लाख २५ हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट स्लीपसह करण याच्याकडे दिले. हे पैसे वैद्यनाथ बँके जाऊन भरण्यासाठी त्यांची बुलेट गाडीही दिली. मुंडे गाडी व रोख रक्कम घेऊन गेला तो परत आलाच नाही. मैड यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता पैसे बँकेत खात्यावर जमा केले नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मुळ गावी व इतर परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आली नाही. त्यामुळे मैंड यांच्या तक्रारीवरुन करण महादेव मुंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.