रेड लाईट एरियात गेला, न्यूड फोटो मागितले; रुग्णालयात अत्याचारापूर्वी आरोपी दारुच्या नशेत होता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:13 PM2024-08-20T21:13:53+5:302024-08-20T21:16:15+5:30
कोलकाता येथील महिला डॉक्टरची लैंगिक अत्याचार करुन हत्ये करण्यात आली. आरोपी संजय रॉयने त्या रात्री दारुच्या नशेत होता असा खुलासा झाला आहे.
कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा झाला आहे. कोलकाता बलात्कार-हत्येचा आरोपी संजय रॉयने त्या रात्री दारू प्यायली होती. त्याच रात्री तो रेड लाईट एरियातही गेला. याशिवाय संजय रॉयने त्या रात्री एका महिलेकडून न्यूड फोटोही मागितल्याची माहिती समोर येत आहे. संजय रॉयने हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये गुन्हा करण्यापूर्वी ऑपरेशन थिएटरचीही पाहणी केली होती.
बदलापूरमध्ये सहा तासापासून रेल रोको सुरूच; संतप्त आंदोलकांचा माघार घेण्यास नकार
आरोपी संजय रॉय १४ ऑगस्टपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या तो १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. संजय २०१९ पासून कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापनमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. दरम्यान आता त्याच्याबाबत रोज नवीन खुलासे होत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजता आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या आपत्कालीन इमारतीत प्रवेश करताना दिसत आहेत. त्याने गळ्यात ब्लूटूथ घातले होते. यानंतर तो ४० मिनिटांनंतर बाहेर पडला तेव्हा त्याच्या गळ्यातून ब्लूटूथ गायब झाला. पोलिसांना पीडित डॉक्टरच्या मृतदेहाजवळ एक ब्लूटूथ सापडले. तपासात संजय रॉय याच्या मोबाईलचे ब्लूटूथ कनेक्टर असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे या भीषण घटनेशी संजय रॉयचा संबंध पोलिसांना सापडला.
कोलकाता पोलिसांच्या तपासात रॉयच्या मोबाईलमध्ये अनेक हिंसक आणि अश्लील व्हिडीओ क्लिप असल्याचे समोर आले आहे. त्याने कोणताही पश्चाताप न करता आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांना सांगितले की, 'तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मला फाशी देऊ शकता.' संजय रॉय याच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने अनेक विवाह केल्याचा आरोप केला. त्याच्या अभद्र स्वभावामुळे त्याच्या तीन पत्नी त्याला सोडून गेल्या.
पॉलीग्राफी चाचणी करण्यास सीबीआयला परवानगी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफी चाचणी करण्यास सीबीआयला परवानगी मिळाली आहे. तपास यंत्रणेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याआधी सीबीआयने आरोपीची मानसिक चाचणी केली होती. आता पॉलीग्राफी चाचणीद्वारे आरोपी किती खोटे बोलतोय आणि किती सत्य आहे हे कळू शकणार आहे.