दहा वर्षापूर्वी झालेल्या भांडणातून मायलेकींवर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 03:43 PM2019-09-13T15:43:39+5:302019-09-13T15:45:12+5:30
१० वर्षापूर्वी कचरा टाकण्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती़.
पुणे : दहा वर्षापूर्वी कचरा टाकण्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून एकाने मायलेकींवर कोयत्याने वार करुन त्यांना जबर जखमी केले आहे़. कोथरुड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे़.
काशिनाथ मुळुक (वय ५५, रा़ गावडे बिल्डिंग, त्रिमुर्ती कॉलनी, आझादवाडी, कोथरुड) असे त्याचे नाव आहे़. ही घटना कोथरुडमधील आझादवाडी येथील गणेशा रेसिडेन्सीसमोर गुरुवारी दुपारी पाऊण वाजता घडली़. याप्रकरणी स्रेहा पवार (वय २१, रा़ कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मनिषा अतुल पवार (वय ४२) व स्नेहा पवार या दोघी गंभीर जखमी आहेत़. मनिषा पवार आणि काशिनाथ मुळुक यांच्यात १० वर्षापूर्वी कचरा टाकण्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती़. मनिषा व स्नेहा पवार या गुरुवारी दुपारी गणेश विसर्जन मिरवणुक पाहत उभ्या होत्या. त्यावेळी मुळुक हा हातात कोयता घेऊन आला व त्याने स्नेहा पवार हिच्यावर वार केले़. ते वार अडविण्यासाठी तिने हात वरती केल्याने तिच्या दोन्ही हाताला जबर जखम झाली आहे़. तिला वाचविण्यासाठी तिची आई मनिषा या मध्ये पडल्या असता मुळुक याने त्यांच्या डोक्यात तसेच हातावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले़. दोन्हींवर उपचार करण्यात येत असून मुळुक याला पोलिसांनी अटक केली आहे़.