पुरंदर तालुक्यात नोकराकडून शेतमालकीण महिलेवर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:01 PM2019-02-04T20:01:56+5:302019-02-04T20:03:24+5:30
कोडीत (ता.पुरंदर) येथे शेतात कामाला असलेल्या नोकरानेच शेतमालकीण महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.
सासवड : कोडीत (ता.पुरंदर)येथे शेतातील गोठ्यात कामाला असलेल्या नोकरानेच शेतमालकीण महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शेतमालकीण अश्विनी जरांडे (रा.कोडीत ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास भाऊसाहेब ठाणगे (वय ३२, सध्या रा.कोडीत, मूळ- धनगाव जि. औरंगाबाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी विकास जरांडे (वय ३०) ) या कोडीत येथे राहत असून त्यांचे पती विकास जरांडे यांचे गुडघ्याचे आॅपरेशन झाल्यामुळे महिला स्वत: शेतीचे कामे करत होती. त्यांचे दीर पुण्यात राहत असून ठाणगे हा गडी त्यांनी कामाला ठेवला आहे. रविवारी सकाळी ९ वाजता अश्विनी या शेतातून काम उरकून परतल्या असतानाच ठाणगे हा घरात घुसला व त्याने महिलेच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. कोयता घेऊन घरात घुसला व त्याने अश्विनी जरांडे यांचे पती विकास जरांडे यास पाठीमागून येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अश्विनी यांनी ठाणगे याला अडविण्याचा प्रयत्न केले असता त्याने त्याच्या हातातील कोयता त्यांच्या डोक्यात मारला आणि परत जर शेतात आली तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. तेव्हा या पती पत्नींनी आरडाओरडा केला असता त्यांच्या घराच्या पाठीमागील शेतात काम करणारे नातेवाईक धावून आले त्यामुळे आरोपीने घरातून पळ काढला. महिलेला उपचारासाठी सासवड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सासवड पोलीस करत आहे.