मोबाईलचा पासवर्ड हातावर लिहून युवतीचा गळफास; मृत्यूचं रहस्य उलगडलं,“तू माझी मैत्री तोडली तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:01 PM2021-07-14T19:01:43+5:302021-07-14T19:03:50+5:30
आरोपीची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला पूर्व बर्दवान येथून अटक केली.
हावडा – पश्चिम बंगालमधील ८ वीत शिकणारी राष्ट्रीय स्तरावरील कराटे खेळाडू युवतीच्या रहस्यमय मृत्यूचं कोडं पोलिसांनी उलगडलं आहे. फेसबुकच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या अल्पवयीन युवतीला ब्लॅकमेल करण्याचा आरोप आरोपीवर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडे आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नव्हता.
फेसबुकच्या माध्यमातून आरोपी अल्पवयीन युवतीला ब्लॅकमेल करत होता. त्यासाठी आरोपीची माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे असणाऱ्या Facebook च्या मुख्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आरोपीची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला पूर्व बर्दवान येथून अटक केली. बुधवारी आरोपीला हावडा येथील कोर्टासमोर उभं केले. न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आधीच लग्न झाल्याचा खुलासा
बाली गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय युवतीचं आणि १९ वर्षीय सन्नी खान याची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. यावेळी अल्पवयीन युवतीनं तिचे काही खासगी फोटो सन्नीला पाठवले होते. काही दिवसांनी अल्पवयीन युवतीला कळालं की, सन्नीचं यापूर्वीच लग्न झालं आहे. तेव्हापासून युवतीने सन्नी खानपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सन्नीला ही गोष्ट खटकली. त्याने युवतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. जर तू मैत्री तोडली तर तुझे सर्व फोटो व्हायरल करेन असं आरोपी सन्नीने युवतीला धमकी दिली.
धमकीनंतर युवतीनं घेतला गळफास
४ जुलै रोजी सन्नीने पीडित युवतीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या धमकीनंतर ५ जुलैला युवतीने तिच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी पोहचले. आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने तिच्या मोबाईलचं पासवर्ड हातावर लिहिला होता. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आणि तपास सुरु केला. युवतीच्या फेसबुक अकाऊंटमध्ये सन्नी खान नाव पोलिसांना सापडलं. पोलिसांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे असणाऱ्या FB च्या मुख्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर सन्नी खानच्या अकाऊंटची माहिती मागितली. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपी सन्नी खानला अटक केली त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.