व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त; आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:54 PM2021-11-17T15:54:00+5:302021-11-17T15:54:41+5:30
Whale vomit worth Rs 2 crore seized : दुकलीविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २,३९,४४,४८ (अ) ,४९ (ब),५७,५१ अन्वेय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली.
ठाणे : अतिशय दुर्मिळ समजली जाणारी व्हेल माशाची वांती/उलटी बेकायदेशीररित्या स्वत:जवळ बाळगून ती विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीच्या श्रीनगर पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. त्यांच्याकडून दोन कोटीहुंन अधिक रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्या दुकलीला येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर १६ येथील साउथ कोस्ट हॉटेल येथे मोटार सायकलीवरून दोघेजण व्हेल माशाची उलटी हे अनिधकृतरित्या जवळ बाळगुण विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चारकोप,कांदिवलीच्या मयुर देवीदास मोरे (३१) आणि अहमदनगर, जामखेडच्या प्रदिप आण्णा मोरे (३४) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती केली असता, त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पिवळसर तांबट रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे दगड सदृष्य वस्तु आढळून आल्या. त्याचे सुमारे ०२.०४८ कि. ग्रॅम वजन असून ती वस्तु ही व्हेल माशाची वांती/उलटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातही ती उलटी मध्यस्थीच्या मदतीने २ कोटी रुपयांना विक्रीसाठी घेवुन आल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्हेल माशाच्या उलटीसह दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा दोन कोटी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या दुकलीविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २,३९,४४,४८ (अ) ,४९ (ब),५७,५१ अन्वेय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे अंबरग्रीस?
व्हेल माशाच्या उलटीतून तयार होणाऱ्या दगडास अंबरग्रीस असे म्हटले जाते. अंबरग्रीसचा लहानसा खडाही शर्टावर चोळल्यास त्यातून निघणारा सुगंध महिनाभर टिकतो. परदेशातील सिगारेटमध्येही सुंगधासाठी अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे परदेशात अंबरग्रीसला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून या अंबरग्रीसच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.