हा कसला दुर्देवी योगायोग! युवकाच्या ज्या हातावर होता नागाचा टॅटू, त्याचठिकाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:17 AM2022-08-12T11:17:07+5:302022-08-12T11:18:17+5:30
रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला.
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका युवकानं उजव्या हाताच्या मनगटावर नागाचा टॅटू गोंदला होता. दुर्देवाने त्याच ठिकाणी नागाने चावा घेतला त्यामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती भोपाळमधील कोलार भागातील रहिवासी आहे.
एएसआय प्रीतम सिंह यांनी सांगितले की, अमित बाथम हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत कोलारच्या गेहुनखेडा येथील वंदना नगर भागात राहत होता. उदरनिर्वाहासाठी तो ऑटोरिक्षा चालवत असे. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तो कामावर जाण्यापूर्वी रिक्षा साफ करत असताना त्यांच्या उजव्या मनगटावरील टॅटूवर साप चावला. ऑटोच्या मागच्या सीटवर साप बसला होता. त्याचा रंग काळा होता. सापाला पळताना पाहून युवक ताबडतोब घरात गेला आणि आपल्या पत्नीला घटनेची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी कोलार येथील जखमी अवस्थेत युवकाला खासगी रुग्णालयात नेले.
रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. आमच्याकडे सर्पदंशासाठी औषध नाही, असे सांगून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले. त्याच्या नातेवाईकांनी जखमीला हमीदिया रुग्णालयात नेत असताना वाटेतच युवकाचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालय व्यवस्थापनाकडून माहिती मिळाल्यानंतर बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान त्याच्या उजव्या हातावर नागाचे टॅटू असल्याचे आढळून आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच टॅटूवरच साप चावला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात भोपाळमध्ये सर्पदंशाने तीन ते चार जणांचा मृत्यू होतो. कधी कधी हा आकडाही वाढतो. सुमारे पंधरवड्यापूर्वी गौतम नगर परिसरातील एका ७७ वर्षीय महिलेचा घरात सर्पदंशाने मृत्यू झाला होता.