अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

By मनीषा म्हात्रे | Published: December 2, 2022 06:43 AM2022-12-02T06:43:06+5:302022-12-02T06:43:37+5:30

माटुंग्यात वर्गातच दोघांकडून विद्यार्थिनीवर अत्याचार, कल्याणला नऊ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

What happened to minors? Increase in cases of sexual assault | अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

googlenewsNext

न कळत्या वयात हाती आलेले मोबाइल, सहज उपलब्ध होणारे पोर्न, त्यातून शरीरसंबंधांबद्दलचा विकृत दृष्टिकोन, त्याच्या परिणामांची जाणीव नसल्याने घडणारे टोकाचे गुन्हे या विळख्यात अल्पवयीन मुले सापडली आहेत. किरकोळ कारणांवरून वाढणारी हिंसेची, सूड घेण्याची प्रवृत्ती यामुळे अल्पवयीन मुले गुन्ह्याच्या विळख्यात अडकत असल्याचे महामुंबईतील दोन घटनांतून दिसून येते. मानसोपचार तज्ज्ञांनी या घटनांची गंभीर दखल घ्या, असा गंभीर इशारा दिला आहे. 

मनीषा म्हात्रे 

मुंबई : पालिकेच्या शाळेत वर्गातील विद्यार्थी डान्सच्या तासासाठी बाहेर जाताच आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी १३ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना माटुंग्यात उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. अस्वस्थ वाटत असल्याने पीडित मुलगी वर्गातच थांबली होती. याचा गैरफायदा घेत वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी दरवाजा लावून घेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. कुणाकडेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दोघांच्या तावडीतून सुटका होताच विद्यार्थिनीने थेट घर गाठले. तिने शाळेत जाण्यास नकार दिला. शांत-शांत राहणाऱ्या मुलीकडे तिच्या वहिनीने विश्वासात घेत चौकशी केली. त्यानंतर मुलीने प्रकरणाला वाचा फोडली. वहिनीने मुलीला धीर देत बुधवारी माटुंगा पोलिस ठाणे गाठले.  पोलिसांनी जबाब नोंदवत, त्या दोन विद्यार्थ्यांविरोधात लैंगिक अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला. या घटनेमुळे विद्यार्थिनीला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून, तिचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तपास सुरू 
पीडित मुलगी आणि आरोपी एकच वर्गातील असून या प्रकरणी गुन्हा नोंदवला असल्याचे माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : स्टेशन परिसराजवळच्या साेसायटीच्या आवारात गुरुवारी सकाळी एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करून नंतर तिची गळा चिरून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पाेलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. 
स्टेशन परिसरात बस डेपाेला लागून ‘न्यू माेनिका’ साेसायटी आहे. रहिवासी सकाळी जागे झाल्यानंतर त्यांना आवारात एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी घटनेची माहिती देताच वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक हाेनमाने घटनास्थळी आले. पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी १५ वर्षांच्या संशयिताला ताब्यात घेतले. हत्या झालेली मुलगी आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुलगा हे दोघेही त्याच परिसरात रस्त्यावर राहतात. मुलाने पाेलिसांना सांगितले, मुलीच्या नातेवाइकांनी त्याला काही दिवसांपूर्वी मारहाण केली हाेती. मात्र, त्याने दिलेली माहिती पोलिस तपासून पाहत आहेत. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पाेलिस या घटनेचा विविध अंगांनी तपास करीत आहेत.

नशेबाजांचा वावर
कल्याण स्टेशन परिसराला रात्रीच्या वेळी नशेबाजांचा विळखा असतो. अनेक नशेबाज  परिसरात फिरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी अनेक गुन्हे घडलेले आहेत. स्टेशन परिसराचा काही भाग हा रात्री उशिरानंतर महिलांसाठी असुरक्षित मानला जातो. 

 

Web Title: What happened to minors? Increase in cases of sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.