क्षणिक सुख महागात पडेल, जेलची हवा खावी लागेल; 'सेक्स स्टेल्थिंग' म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 11:50 AM2023-03-18T11:50:01+5:302023-03-18T11:50:45+5:30
आता हा प्रकार गंभीर स्वरुपाचा गुन्हा मानला जात आहे. अनेक देशात सेक्स स्टेल्थिंग हा गुन्हा आहे.
अलीकडेच नेदरलँडमध्ये असं समोर उघडकीस आलंय जिथे सेक्सवेळी पार्टनरनं विना मर्जी कंडोम काढले. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा मुलाने असं कृत्य करून मुलीचा विश्वासघात केल्याचं न्यायाधीश म्हणाले. मुलीचा जगण्याचं मूलभूत स्वातंत्र्य हिरावण्याचा हा प्रकार असून कोर्टाने आरोपी मुलाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
तुम्हाला माहित्येय? सेक्स स्टेल्थिंग म्हणजे काय. सेक्स स्टेल्थिंग म्हणजे ती फसवणूक जी क्षणिक सुखासाठी पार्टनरसोबत बेडवर केली जाते. म्हणजे संभोग करतेवेळी पार्टनरला न सांगता कंडोम हटवणे. अनेकदा मुले क्षणिक सुखासाठी मज्जा म्हणून याप्रकारची मुलीची फसवणूक करतात ज्यात मुलीला न सांगता कंडोम काढले जाते. परंतु आता हा प्रकार गंभीर स्वरुपाचा गुन्हा मानला जात आहे. अनेक देशात सेक्स स्टेल्थिंग हा गुन्हा आहे.
पार्टनरची फसवणूक करून जेलची हवा खावी लागेल
याआधीही सेक्स स्टेल्थिंगचे अनेक प्रकरणे समोर आलीत. न्यूझीलंडमध्ये २०१८ मध्ये ५० वर्षीय जेसी नावाच्या एका व्यक्तीवर संभोगावेळी कंडोम हटवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. जेसीने एका देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत १ तासासाठी व्यवहार केला होता. परंतु सेक्स करताना महिलेच्या इच्छेविरोधात तिला न जुमानता जेसीने बळजबरीने कंडोम हटवले. या घटनेनंतर महिलेने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. दिर्घकाळानंतर या खटल्यावर निकाल आला त्यात जेसीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून दोषी ठरवत त्याला ३ वर्ष ९ महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली.
अनेक देशात संभोगावेळी कंडोम हटवणे गुन्हा
न्यूझीलंडमध्येच काही महिन्यांपूर्वी २८ वर्षीय युवकाला सेक्स स्टेल्थिंगसाठी जेलमध्ये जावे लागले. तर जर्मनीत एका पोलिसालाही शिक्षा सुनावण्यात आली. आता संपूर्ण जगात या मुद्द्यांवरून चर्चा सुरू झाली आहे. अनेक युरोपियन देशात फसवणूक करून कंडोम हटवणे या गुन्ह्याविरोधात कायदा बनवत आहेत. असुरक्षित संबंध ठेवणे विशेषत: मुलींमध्ये याविरोधात जागरुकता वाढत आहे. मुली पार्टनरसोबतच्या बेड चीटिंगविरुद्ध कोर्टात जात आहेत.