कारच्या सायलेन्सरमध्ये दडलंय काय?; सोन्यापेक्षा किंमती ‘या’ वस्तूमुळे चोरांना लागला जॅकपॉट
By प्रविण मरगळे | Published: January 8, 2021 11:52 AM2021-01-08T11:52:40+5:302021-01-08T11:53:16+5:30
चोरी केल्यानंतर हे धातूचे कण सूरत आणि अहमदाबादसारख्या ठिकाणी जड उद्योगाला विकले गेले
अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये इको व्हॅनच्या रूपाने वाहन चोरांना जॅकपॉटने लागला आहे, गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी या वाहनाच्या सायलेन्सरवर हात साफ केला आहे. एका आठवड्यात २१ लाख किंमतीचे सायलेन्सर चोरी झाल्याची घटना घडली आहे. सात दिवसांतच अहमदाबादमधील दोन कार डीलरशिप सनाथलमधील किरण मोटर्स आणि बकरोलमधील लोकप्रिय मारुती सुझुकी मोटर्स स्टॉकयार्डने पार्क केलेल्या ३३ वाहनांना निशाणा बनवण्यात आला आहे.
इको व्हॅन सायलेन्सरची किंमत सुमारे ५७ हजार २७२ रुपये आहे. या दोन कार स्टॉकयार्डमधून चोरट्यांनी एकूण २० लाख ५९ हजार रुपये किंमतीचे सायलेन्सर चोरून नेले. सायलेन्सरमध्ये कॅटलॅटिक कन्व्हर्टर असते, जो प्लॅटिनम ग्रुप ऑफ मेटल्स (पीजीएम)ने बनलेला असतो. प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यांना PGM म्हणतात. त्यांची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे.
चोरी केल्यानंतर हे धातूचे कण सूरत आणि अहमदाबादसारख्या ठिकाणी जड उद्योगाला विकले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ग्रॅम मेटल डस्ट किंमत ३ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच, सेन्सरही भारताबाहेर आहे, ज्याची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा खेळ सुरू होता. चोरीच्या एक-दोन घटनांकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु पोलिसांना मोठ्या संख्येने चोरीची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला त्यावेळी ही चोरी उघडकीस आली, पोलिसांनी या प्रकरणात चोरांना अटक केली आहे.