अबब...हे काय!...विरारमध्ये भिक्षेच्या नावाखाली होतंय मोबाईल चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 07:23 PM2020-10-22T19:23:36+5:302020-10-22T19:43:44+5:30
Mobile Robbery : चक्क बाल भिकाऱ्यांची टोळीच आहे सक्रिय : या मुलांकडे सापडले 14 महागडे मोबाईल
आशिष राणे
वसई - विरारमध्ये भीक मागण्याच्या नावाखाली चक्क मोबाईल चोरी करण्याचा गोरस धंदा सध्या तेजीत सुरू असल्याचा भांडाफोड झाला आहे. इथं भीक (भिक्षा) मागणाऱ्या त्या बाल भिकाऱ्यांकडे चक्क चोरीचे 14 महागडे मोबाईल सापडल्याचे प्रकरण नुकतंच उघडकीस आले असल्याने खळबळ उडाली असुन घडल्या प्रकराची विरार पोलिसांनी नोंद घेतली आहे.
अधिक माहितीनुसार,विरार पूर्वेच्या आरजे नाका येथे काही भिकारी चोरी करत असल्याचा संशय परिसरातील काही दक्ष नागरिकांना आल्याने त्यांनी लागलीच ते राहत असलेल्या ठिकाणाची तपासणी केली असता तिथं त्यांना चक्क जमिनीत गाढून व लपवून ठेवलेले 14 महागडे स्मार्ट मोबाईल फ़ोन सापडले. या प्रकरणी तेथील रहिवाशांनी याबाबतची माहिती विरार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत एक महिलांसहीत ते मोबाईल फोन ही जप्त केले आहेत.
विशेष म्हणजे मागील महिनाभर आधी सुद्धा असाच प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला होता. वसई विरार शहरातील रस्त्यांवर, गर्दीच्या ठिकाणी तसेच महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर हे बाल भिकारी भीक म्हणून पैशाची मदत मागण्याच्या बहाण्याने उघड्या चारचाकी गाडीमध्ये हात घालून गाडीतील प्रवाश्यांचे लक्ष नसताना हातचलाखीने अक्षरशः वस्तू लंपास करण्यात सक्रिय आहेत. हे बाल भिकारी आपल्या टोळीप्रमुखाच्या सल्ल्याने ही सर्व करीत असल्याचे समजते आहे. दरम्यान लॉकडाऊननंतर वसई-विरार शहरात अशा बाल भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
वसई विरारच्या पोलीस आयुक्तांनी यातील नेमका टोळी मोरक्या शोधावा !
याबाबत वसई तालुक्यात अशा या बाल भिकाऱ्यांची नेमकी संख्या वाढली कशी किंवा याच्या मागे कोणी टोळी चालवणारा मोरक्या सक्रिय आहे का ? याचा देखील सूक्ष्म तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून होणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वाढीस लागल्यास त्यास प्रतिबंध घालणं अडचणीचे ठरेल.