महिलेच्या नावे करत होता व्हॉटस अॅप मॅसेज ; मुंबईसह पुण्यात घातला अनेकांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 08:59 PM2019-09-09T20:59:26+5:302019-09-09T21:00:45+5:30
आर्थिक फसवणूक करणाऱ्या नायजेरियनला अटक
मुंबई - महिला असल्याचे भासवून व्हॉटस अॅप मॅसेज करुन व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणूकीचे आमिष दाखविणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला आरे पोलिसांनी आज अटक केली. स्टीफन नॉबुझल (वय ४०) असे त्याचे नाव असून अशा प्रकारे मुंबई व पुणे येथे अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली.
आरे परिसरात रहात असलेल्या अनिल साळवी या तरुणाला एक महिला गेल्या काही दिवसापासून व्हॉटस अॅपद्वारे मॅसेज व कॉल करुन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आग्रह करत होती. तिने शनिवारी दुपारी आरे कॉलनी एके ठिकाणी पैसे व कागदपत्रे घेवून बोलाविले. त्याठिकाणी आपला मित्र येईल, त्याच्याकडे पेपर देण्यास सांगितले. त्याबद्दल संशय आल्याने साळवीने पोलिसांना फोन करुन कळविले. त्यानुसार त्या परिसरात साध्या वेषात पाळत ठेवून थांबले. एका रिक्षातून आलेल्या नायजेरियन तरुण साळवीला भेटून मॅडमने पाठविल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता स्टीफनने आपण महिलेच्या नावे हे कृत्य करीत असल्याची कबुली दिली