व्हॉट्सअॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:43 AM2018-11-21T03:43:14+5:302018-11-21T03:46:41+5:30
दीड वर्षांपूर्वी घरातून गायब झालेल्या ५ तोळ्यांच्या हाराचे गूढ व्हॉट्सअॅप डीपीमुळे उलगडल्याचा प्रकार आग्रीपाडामध्ये समोर आला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रिटा गोराय (४०) नावाच्या मोलकरणीला अटक केली.
मुंबई : दीड वर्षांपूर्वी घरातून गायब झालेल्या ५ तोळ्यांच्या हाराचे गूढ व्हॉट्सअॅप डीपीमुळे उलगडल्याचा प्रकार आग्रीपाडामध्ये समोर आला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रिटा गोराय (४०) नावाच्या मोलकरणीला अटक केली. तसेच पश्चिम बंगालमधून हार हस्तगत केला.
लोअर परळ येथील कल्पवृक्ष इमारतीत तक्रारदार कुटुंबीय राहते. मालकीण घरातील दागिने पाहत असताना, ५ तोळ्यांचा हार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात सर्वत्र शोधूनही हार न सापडल्याने, तसेच घरातील काही वस्तूही गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक नागेश पुराणिक, हवालदार सचिन खानविलकर यांनी तपास सुरू केला. घरातील चारही नोकरांचे मोबाइल तपासणीसाठी घेतले. तेव्हा रिटाच्या मोबाइलमध्ये तिच्या कुटुंबातील सर्वांचे डीपी दिसले. एका डीपीतील महिलेच्या गळ्यातील हार पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी तो फोटो मालकिणीला पाठविला. त्यांनी हार ओळखल्यानंतर पोलिसांनी रिटाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखविताच, रिटाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना ज्या महिलेच्या गळ्यात हार दिसला, ती पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त खेड्यात राहणाऱ्या रिटाच्या भाच्याची पत्नी होती. रिटाने दीड वर्षांपूर्वी हार चोरून भाच्याच्या लग्नात त्याच्या पत्नीला भेट दिला होता.