कुख्यात कडवला पोलीस कधी पकडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:14 PM2020-07-02T20:14:11+5:302020-07-02T20:17:35+5:30

राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करणाऱ्या आणि अनेकांची मालमत्ता हपडून कोट्यवधींचा मालक बनलेला कुख्यात गुंड मंगेश कडव गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

When will the infamous Kadwala be caught by the police? | कुख्यात कडवला पोलीस कधी पकडणार?

कुख्यात कडवला पोलीस कधी पकडणार?

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवसात तीन गुन्हे : कडव मात्र फरारच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करणाऱ्या आणि अनेकांची मालमत्ता हपडून कोट्यवधींचा मालक बनलेला कुख्यात गुंड मंगेश कडव गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, त्याच्या बचावासाठी काळ्या धंद्यात गुंतलेल्यांची एक मोठी फळीच धावपळ करीत आहे. दुसरीकडे कडवच्या पोलीस कधी मुसक्या बांधणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
कडवविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा आणि बजाजनगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुली, धमकावणे आणि फसवणूक करण्याचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कडव त्याच्या पाठीराख्याच्या आश्रयाला गेला. रात्रभर तेथे थांबल्यानंतर कडवला भल्या पहाटे ‘तुमसर’कडून वाट दाखविण्यात आली. त्यावेळीपासून कडव गायब झाला तो पोलिसांना सापडलाच नाही. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी ‘तुमसर’च्या वाटेवरील अनेकांची चौकशी केली. परंतु त्यांनी कडवबद्दलची ठोस माहिती पोलिसांना मिळणार नाही, याची तसदी घेतली. त्यामुळे पोलिसांनी आता कडवला शोधण्यासाठी दुसरा मार्ग चोखाळला आहे. तो कुठे कुठे लपू शकतो, ते स्पॉट पोलिसांनी कागदावर घेतले असून, त्या त्या ठिकाणांवर पोलिसांनी नजर रोखली आहे. कडव गायब होण्याच्या आणि पळून जाण्याच्या दोन्ही पर्यायावर विचार करून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, कडव मंगळवारी नागपुरातून बाहेर पळून गेल्याची त्याच्याशी संबंधित वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे तो नागपुरातच दडून असल्याचेही बोलले जात आहे.
दुसरीकडे कडवने कायद्याच्या कचाट्यातून आपली मानगूट सोडवून घेण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न चालविले आहे. साथीदारांच्या माध्यमातून तो जवळीक असलेल्या अनेकांशी संपर्क करून कायदेशीर सल्ला घेत आहे.

अधिकाऱ्यांच्या बैठकीतही कडव
शहरातील गुन्हेगारी आणि पुलिसिंग यासंबंधाने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीतही मंगेश कडव प्रकरणावर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे.

सिनेमातील गुंडासारखे कडवचे साम्राज्य
विशेष म्हणजे, शहरातील अनेक गुंडांसोबतही कडवचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. चार वर्षांपूर्वी कुख्यात गुंड संतोष आंबेकरसाठी आयोजित केलेली बर्थ डे पार्टी त्याच्या गळ्यातील हड्डी बनली होती. त्यावेळी त्याने अनेकांना पद्धतशीर मॅनेज करून स्वत:ला कारवाईपासून दूर ठेवले होते.

आलिशान वाहनांचा मालक
कडवजवळ आजघडीला अनेक महागडी आणि आलिशान वाहने आहेत. त्यात बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीजसारख्या कारचाही समावेश आहे. त्याच्याकडे हार्ले डेवीडसन ही महागडी बाईकही आहे. त्याने ही आलिशान वाहने विकत घेण्यासाठी कोणते कष्ट घेतले, याचा पोलिसांनी कसून तपास केल्यास आणखी दोन-तीन गुन्हे दाखल होऊ शकतात.

Web Title: When will the infamous Kadwala be caught by the police?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.