औरंगाबादेतील बेपत्ता १०० महिला आता आहेत कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:20 PM2019-12-24T14:20:02+5:302019-12-24T14:22:28+5:30
वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : १७ जुलैपासून दहा महिन्यांच्या बाळासह बेपत्ता झालेल्या पत्नीचा तपास न लागल्याने सुरक्षारक्षक पती रामराव घुले यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच शहराच्या वेगवेगळ्या भागांतून चार वर्षांत बेपत्ता १०० महिलांचा शोध लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. या महिला, तरुणी कोठे असतील आणि त्यांची काय अवस्था असेल, या चिंतेने नातेवाईकांची झोप उडाली आहे.
शहराची लोकसंख्या पंधरा लाखांहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, गुन्हे कमी होत नसल्याचे दिसून येते. विशेषत: महिला, तरुणी घरातून निघून जाण्याचे अथवा त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढतच असल्याचे दिसून येते. चार वर्षांच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या ४८९ महिला वेगवेगळ्या कारणाने बेपत्ता झाल्या होत्या.
यातील सर्वाधिक महिला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहेत. याविषयी तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तपास करून महिलांची शोध प्रक्रिया सुरू होते. बऱ्याचदा तपास करूनही बेपत्ता महिलांचा पोलिसांना शोध लागत नाही. २०१६ साली शहरातील ९६ महिला बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ६९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. २०१७ साली बेपत्ता १३७ महिलांपैकी २० महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. २०१८ साली शहरातून गायब झालेल्या १३० महिलांपैकी १७ महिलांचा थांगपत्ता नाही, तर चालू वर्षी नोव्हेंबरपर्यंत १२६ महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यातील ९३ महिलांचा शोध लागला, तर उर्वरित ३३ महिला मिळाल्या नाहीत. बेपत्ता झालेल्या १०० महिला कोठे असतील, काय करीत असतील, त्यांना कोणी डांबून ठेवले तर नसेल ना, यासह अनेक प्रश्नांमुळे त्यांच्या नातेवाईकांना झोप येत नाही.
पोलिसांचे उत्तर : तपास सुरू आहे
उस्मानपुरा परिसरातील सुरक्षारक्षक रामराव घुले यांची पत्नी १७ जुलै रोजी दहा महिन्यांच्या चिमुकल्यासह बेपत्ता झाली. यानंतर त्यांनी लगेच उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार दाखल केल्यापासून ते आजपर्यंत आपल्या पत्नीसह बाळाचा तपास लागला काय, हे विचारण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवीत आहेत. तपास सुरू आहे, एवढेच उत्तर त्यांना मिळते. यामुळे शेवटी त्यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणावर आता २ जानेवारी रोजी सुनावणी आहे. या घटनेमुळे शहरातील बेपत्ता झालेल्या महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
२०१६
९६ महिला बेपत्ता
६९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश
२०१७
१३७ महिला बेपत्ता
२0 महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही
२०१८
१३0 महिला बेपत्ता
१७ महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही
२०१९
१२६ महिला बेपत्ता
९३ महिलांचा शोध लागला