नांदेडमधील बेपत्ता झालेले ६५२ जण गेले कुठे ? आकडेवारी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:53 PM2019-12-19T18:53:11+5:302019-12-19T18:58:59+5:30
शिर्डी येथून वर्षभरात ९० भाविक बेपत्ता झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे.
नांदेड : राज्यामध्ये शिर्डी येथील बेपत्ता नागरिकांचे प्रकरण नुकतेच ऐरणीवर आले आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील आकडेवारीही समोर आली असून गेल्या पाच वर्षांत येथील २७४८ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी २०५१ जणांचा शोध लागला असला तरी अद्यापही ६५२ जण बेपत्ता आहेत. अचानक बेपत्ता होणारे हे नागरिक कुठे आहेत. त्यांचे काय झाले. याबाबत पोलीस प्रशासनाकडेही कुठलीही माहिती नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
शिर्डी येथून वर्षभरात ९० भाविक बेपत्ता झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे. नांदेड येथेही अशाच पद्धतीने बेपत्ता होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असल्याचे पोलीस आकडेवारी सांगते. जिल्ह्यातील २०११ ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीतील बेपत्ता प्रकरणांची माहिती घेतली असता, आतापर्यंत २७४८ जण बेपत्ता झाल्याचे पुढे आले. यामध्ये १४२८ पुरुष तर १३२० महिलांचा समावेश आहे. या बेपत्ता नागरिकांपैकी १०६० पुरुष व ९५१ महिला अशा एकूण २०५१ जणांचा कालांतराने शोध लागला. मात्र यातील ६५२ जण गेले कुठे याची माहिती ना त्यांच्या कुटुंबियांना आहे ना पोलीस यंत्रणेला. नागरिक बेपत्ता होण्याची कारणे विविध असली तरी अलीकडील काळात ही संख्या वाढत असल्याचे चिंताजनक चित्र आहे.
मनोरुग्णांचे प्रमाण जास्त
नागरिकांचे बेपत्ता होण्यामागे विविध कारणे असली तरी, यात सर्वाधिक संख्या ही मानसिक संतुलन बिघडलेल्या नागरिकांची आहे. याबरोबरच वैवाहिक जीवनातील भांडण तंट्यामुळेही अनेक जण घर सोडून जात असल्याचे पोलीस तपासावरून दिसते. चालू वर्षाची आकडेवारी पाहिली असता मागील १० महिन्यांत ६२२ जण बेपत्ता झाले असून यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे ३४६ महिलांचा समावेश आहे. च्या कालावधीत बेपत्ता झालेल्या ६२२ पैकी ९८ पुरुष व १४२ महिलांचा शोध लागला असला तरी अद्यापही १७८ पुरुष व १६८ महिला बेपत्ता आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक कलह, क्षणिक रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा घराकडे परतावेसे वाटते. मात्र टीकाटिप्पणीच्या भीतीपोटी ते परत येण्याचे टाळतात.
घरातून निघून जाण्याची कारणे पाहिली असता प्रामुख्याने कौटुंबिक कलहातून विकोपाला गेलेली भांडणे, व्यसनामुळे बिघडलेली मानसिक स्थिती, तीव्र उदासीनता, व्यक्तिमत्त्व दोष आदी तत्सम कारणे आढळतात. आक्रमक वृत्ती, उतावीळपणा याबरोबरच परिणामांचा अंदाज घेण्याची क्षमता हरवून निर्णय घेण्याची वृत्ती नाहीशी होणे आदी कारणे आढळतात. बेपत्ता होणाऱ्या अनेकांना मानसिक आजारही जडलेला असू शकतो. मात्र तरीही या सर्व बाबी टाळण्यासाठी कौटुंबिक सकारात्मक संवाद हा एकमेव पर्याय आहे.
- डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड