मारिया खान कुठेय?; तक्रारीसाठी आली आणि गायब झाली, ९० दिवसाची मिसिंग मिस्ट्री
By मनीषा म्हात्रे | Published: August 20, 2023 08:07 PM2023-08-20T20:07:56+5:302023-08-20T20:08:22+5:30
भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मारिया खान ही उच्च शिक्षित असून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते
मुंबई : पती पत्नीतील वाद पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांना बोलावून समजूत काढली. त्यानंतर, दोघे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. मात्र, ती घरी परतली नाही. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेरून बेपत्ता झालेली मारिया खान नेमकी कुठे गेली? याचे गूढ ९० दिवस उलटूनही समोर आलेले नाही. याबाबत भोईवाडा पोलीस तिचा शोध घेत आहे.
भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मारिया खान ही उच्च शिक्षित असून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. २०१९ मध्ये तिचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अक्रमशी विवाह झाला. लग्नानंतर ती गोवंडीत राहण्यास गेली. फेब्रुवारी महिन्यात अचानक अक्रम तिला घेऊन घरी धडकला. मारियाचे अन्य मुळाशी प्रेम संबंध असल्याचे सांगत तिला माहेरी सोडून निघून गेला. दोघांमध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोघांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. पोलिसांनीही त्यांच्यात समजूत काढण्याचा प्रयत्न केला. १८ मे रोजी दोघांनाही भोईवाडा पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. दोघांना पोलिसांनी समजावून एकमेकांशी संवाद साधण्यास सांगितले. त्यानंतर, दोघेही बाहेर पडले.
मात्र, मारिया घरी आली नाही. मोबाईलही पोलीस ठाण्याच्या टेबलवर सोडून ती गायब झाली. बराच वेळ झाला तरी ती न परतल्याने कुटुंबीयांनी फोन कारण्यास सुरुवात केला. फोन पोलीस ठाण्यातच मिळून आला. सीसीटीव्हीमध्येही ती बाहेर जाताना दिसते. अखेर, २१ तारखेला कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हरवल्याची नोंद करत तपास सुरु केला. मात्र ९० दिवस उलटले तरी मुलीचा शोध लागत नसल्याने कुटुंबियांकडून तपासावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बायको गायब, पती शादी डॉट कॉमवर
माझी बहीण नेमकी कुठे गेली? तिचे नेमके काय झाले? असे अनेक प्रश्न आम्हाला त्रास देत आहे. हवा तसा तपास होताना दिसत नाही. बहिणीचा शोध सुरु असताना तिच्या पतीने शादी डॉट. कॉम वर दुसऱ्या पत्नीचा शोध सुरु केल्याचीही माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आमचा संशय वाढत आहे. पोलिसांनी थोडी कठोर पावले उचलत बहिणीचा शोध घेणे गरजेचे आहे. - अल्तमश, परदेशात राहणारा मारियाचा भाऊ
तपास सुरु
मारिया खान यांचा तपास सुरु आहे. संबंधितांकडे चौकशीही सुरु आहे. पथक त्यांचा शोध घेत असल्याचे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी सांगितले.