दुबईतील ‘ती’ बॅग गेली कुणीकडे? पोलिसांचा मुंबई ते दुबई तपास, चौघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 10:27 AM2022-11-26T10:27:32+5:302022-11-26T10:28:22+5:30
आग्रीपाडा पोलिसांकडून सध्या ‘या’ बॅगेचे गूढ उलगडण्यासाठी तपासचक्र सुरू झाले आहे. आग्रीपाडा परिसरात पीडित कुटुंब राहते. कुटुंबातील १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेर, जावेद, सय्यद पापा उर्फ काफिया आणि समीना या चौघांविरोधात विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मनीषा म्हात्रे -
मुंबई : दुबईवरूनमुंबईत होणाऱ्या सोन्याच्या तस्करीला ब्रेक लावण्यासाठी विमानतळावर कडेकोट यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्यातच दुबई विमानतळावर एका प्रवाशाला बॅग सोपवून ती मुंबईत नेण्याची जबाबदारी देण्यात आली. पैशांच्या आमिषाला बळी पडून त्यानेही बॅग पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, विमानतळावरील सुरक्षा बघून त्याने, बॅग तेथेच सोडून मुंबईत पळ काढला. मात्र, तो मुंबईत आल्यानंतर बॅगेसाठी त्याला धमकाविण्यास सुरुवात झाली. त्याच्या कुटुंबीयांनाही धमकाविले जात असल्याने अखेर त्याने पोलिसांत धाव घेतली.
आग्रीपाडा पोलिसांकडून सध्या ‘या’ बॅगेचे गूढ उलगडण्यासाठी तपासचक्र सुरू झाले आहे. आग्रीपाडा परिसरात पीडित कुटुंब राहते. कुटुंबातील १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेर, जावेद, सय्यद पापा उर्फ काफिया आणि समीना या चौघांविरोधात विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी तिचे वडील दुबईला गेले होते. परत येताना त्यांना काही लोकांनी दुबई विमानतळावर एक बॅग दिली होती. मात्र, तेथील सुरक्षा यंत्रणा बघून घाबरल्याने ती बॅग विमानतळावरच सोडून ते मुंबईमध्ये परतले. ही बाब त्यांनी घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर, १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान चौघांकडून त्यांच्या राहत्या घरासह आजी- आजोबांच्या घरी तसेच रस्त्यात अडवून धमक्या सुरू झाल्या. पैशांची मागणी सुरू झाली. या धमक्यांमुळे वडील लपून राहत आहेत.
चौघांनी मुलीला वाटेत अडवले. तिचे केस ओढून, ‘डॅडी को सोना लेके हाजीर होने के लिए बोलो, नहीं तो आप को उठवाके जान से मार देगें’, अशी धमकी दिली. तसेच, काफिया याने त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून त्याखाली सोना लेके फरार, असा व्हॉट्सॲप संदेश ग्रुपमध्ये पाठवून त्यांच्या वडिलांची बदनामी करण्यास सुरुवात केल्याचेही मुलीने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी कसून तपास सुरु असून लवकरच या संपूर्ण घटनेचा उलगडा होईल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. नेमके काय उघड होते याकडे लक्ष लागले आहे.
बॅगेचे गूढ...
गुन्हा नोंदवत चारही आरोपींचा शोध सुरू केला आहे. नेमकी बॅग कोणी दिली? तिचे काय झाले? याबाबत अधिक तपास सुरू आहे. तक्रारदाराच्या वडिलांकडेही बॅगेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी बॅगेचे गूढ कायम आहे.
- योगेंद्र पाचे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आग्रीपाडा पोलिस ठाणे