आफताबचे आईवडील नेमके आहेत तरी कुठे? दिल्ली, माणिकपूर पोलिसांकडून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:04 PM2022-11-23T12:04:15+5:302022-11-23T12:05:18+5:30
आफताबचे आईवडील गेली १८ वर्षं वसईत राहत होते, मात्र अचानक दिवाळीच्या दरम्यान त्यांनी घर रिकामे केले. घर रिकामे करताना त्यांनी आपल्या लहान मुलाला मुंबईला नोकरी लागल्याचे, तसेच गर्दीतून त्याला प्रवास करावा लागत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते.
नालासोपारा : श्रद्धा हत्याकांड प्रकरण उघड होऊन आठ दिवस उलटले, तरीही तपासाचा महत्त्वाचा भाग असलेले आफताबचे आईवडील यांचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. दिल्ली व माणिकपूर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
आफताबचे आईवडील गेली १८ वर्षं वसईत राहत होते, मात्र अचानक दिवाळीच्या दरम्यान त्यांनी घर रिकामे केले. घर रिकामे करताना त्यांनी आपल्या लहान मुलाला मुंबईला नोकरी लागल्याचे, तसेच गर्दीतून त्याला प्रवास करावा लागत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते.
गेली १८ वर्षे आफताबचे आईवडील वसईतील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. महत्त्वाचे म्हणजे, १५ दिवसांपूर्वी आफताबच्या आईवडिलांनी वसईतील घर रिकामे करून मुंबईला जातो, असे सोसायटीच्या लोकांना व पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. १५ दिवसांपूर्वी जेव्हा वसईतील घर रिकामे केले, त्यानंतर काही वस्तू घरात राहिल्या होत्या. त्या नेण्यासाठी दोन दिवसांनी वसईतील घरी आरोपी आफताब येऊन गेला असल्याची खळबळजनक माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
चौकशीसाठी वसईत आणणार का? -
आफताबच्या आईवडिलांचा मीरा रोड येथील राहण्याचा पत्ता पोलिसांना मिळाला आहे, मात्र ते घरी नसून घर बंद असल्याचे कळते. दिल्ली पोलिस आफताबच्या आईवडिलांची चौकशी करणार आहेत, असे सांगण्यात आले. आरोपी आफताब याला तपासासाठी दिल्ली पोलिस वसईत आणणार का, याकडेही वसईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.