घडता की बिघडता पंजाब... एकेकाळी ड्रग्जने पाेखरले, आता गॅंगवॉर करतेय तरुणाईला उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 09:46 AM2022-06-05T09:46:48+5:302022-06-05T11:36:47+5:30
Punjab : आता गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबला नवा आजार जडला आहे, तो म्हणजे गँगवॉर आणि या गँगवॉरला खतपाणी घातले जात आहे ते खलिस्तानी चळवळीतून.
- मनाेज रमेश जाेशी, वृत्त संपादक, मुंबई
पंजाब... नाव ऐकले की डोळ्यासमोर हिरवे शेत आणि तिथे काम करणारे कष्टकरी पंजाबी लोक येतात. पंजाब हे देशातील एक कृषीसमृद्ध राज्य आहे. पण, वरवर शांत वाटत असलेले हे राज्य पोखरले जात आहे. एकेकाळी राज्याला ड्रग्सची किड लागली होती. आता गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबला नवा आजार जडला आहे, तो म्हणजे गँगवॉर आणि या गँगवॉरला खतपाणी घातले जात आहे ते खलिस्तानी चळवळीतून.
या गँगवॉरने अनेक बळी घेतले. त्यात एक नाव जोडले गेले पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचे. भरदिवसा मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येसाठी अत्याधुनिक रशियन रायफल वापरण्यात आली. गँगस्टर्सच्या हाती अशा प्रकारच्या रायफल्स म्हणजे एका नव्या संकटाची सुरूवात होय.
पंजाब हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे धगधगत राहिलेले आहे. ८०च्या दशकात पंजाबला दहशतवादाने पोखरले होते. संध्याकाळी सहाच्या आत घरात, असा नियमच होता. कुठे आणि कधी गोळीबार किंवा बॉम्बस्फोट होईल, हे सांगता येईना. त्याचवेळी ड्रग्सची किडही तरुणाईला विळखा घालू लागली होती. आता गँगवार तरुणाईला उद्ध्वस्त करायच्या मार्गावर आहे. मुसेवाला यांची हत्या याच गॅंगवारमधून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. परंतु, यात काही राजकीय पार्श्वभूमी असल्याची शक्यताही नाकारता
येत नाही.
मुसेवाला यांची हत्या कशासाठी?
मुसेवाला हे प्रसिद्ध पंजाबी गायक होते. तरुण आणि सळसळते रक्त. लाखो चाहते. त्यांची बिश्नोई गँगसोबत दुश्मनी कशी, असा प्रश्न पडला असेल. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अकाली दलचे युवा नेते विक्रमजीतसिंह मिड्डुखेडा यांची हत्या झाली होती. या हत्येशी मुसेवाला यांचा संबंध असल्याचा दावा बिश्नोई गँगने केला आहे. मुसेवाला यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगने तशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या होत्या. मुसेवाला यांना बिश्नाेई गॅंगकडून धमक्याही मिळत हाेत्या.
अनेक गँग आता आमने-सामने
मुसेवाला यांची हत्या झाल्यानंतर किमान ६ गँग समोर आल्या आहेत. भूप्पी राणा या गँगने मुसेवाला यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे जाहीर केले. नीरज बवाना गँगही बिश्नोईविरुद्ध उभी राहिली आहे. बवाना गँगचे दुबईपर्यंत संबंध असल्याचे बोलले जाते. तर कोणताही संबंध नसलेली बंबीहा गँगही या वादात उतरली आहे. राणा आणि बिश्नोई हे एकमेकांचे कट्टर शत्रू. संपत नेहरा या गँगस्टरचीही हत्येप्रकरणी चौकशी केली आहे.
रिंदाचीही मोठी दहशत
मूळचा नांदेडचा असलेला गॅंगस्टर हरविंदरसिंह रिंदाचीही दहशत वाढली आहे. ताे पाकिस्तानात असून आयएसआयच्या इशाऱ्यावरत दहशतवादी कारवाया करत आहे. त्याच्याही निशाण्यावर पंजाब आहे.
तिहार पुन्हा चर्चेत
तिहार तुरुंग मुसेवाला हत्याकांडानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. लॉरेन्स बिश्नोई याच ठिकाणी कैदेत आहे. संपत नेहरादेखील तेथेच आहे. तिहारमधूनच बिश्नोई हा सूत्रे हलवित असल्याचा दावा केला जातो. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ज्याच्यामुळे अडचणीत आली तो सुकेश चंद्रशेखर हादेखील तिहारमध्येच असून तिथूनच त्याने खंडणीखोरीची सूत्रे हलविल्याचा आरोप आहे.
का वाढले गनकल्चर?
अमेरिकेतील गन कल्चर प्रमाणेच पंजाबमध्येही गन कल्चर वाढत असून नवोदित गायकांकडून त्याला खतपाणी घातले जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. मुसेवालादेखील त्यास अपवाद नव्हते. बंदुका आणि रायफल्ससोबत त्यांनी अनेक छायाचित्रे सोसल मिडीयावर पोस्ट केली आहेत. प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहेंदी यांनी याकडे लक्ष वेधले हाेते.
सलमान खानलाही धमकी
बिश्नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानलादेखील धमकी दिली होती. "रेडी" चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्याने हल्ल्याचा कट रचला होता. त्यानंतर २०२० मध्ये त्याचा साथीदार नरेश शेट्टी याने सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पण, त्याचा हेतू साध्य झाला नाही.
बिश्नोई गँगचे मुख्य काम खंडणीखोरीचेच आहे. अनेक व्यावसायिकांकडून त्याचे पंटर खंडणी उकळतात.