लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक, रायगड नगररचना सहायक संचालक किशोर गिरोल्ला गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:57 AM2018-09-29T04:57:41+5:302018-09-29T04:58:07+5:30
रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता रंगेहात पकडले.
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील बांधकामास भोगवटा दाखल्याकरिता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामाकरिता सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला याने या
बांधकामाचे बांधकाम सल्लागार यांच्याकडे शुक्रवारी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती लाचेची रक्कम ४० हजार रुपयांवर आली. बांधकाम सल्लागार यांनी तत्काळ रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन याबाबत रीतसर तक्रार दाखल केली.
तक्रारी बाबत तत्काळ खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या पथकाने नगररचना कार्यालयात आणि गिरोल्ला याच्या केबिनमध्ये सापळा रचून त्यास ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बकाले हे करीत आहेत.