चक्क निलंबित पोलिसाकडून लाच घेताना कपडे व्यावसायिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:35 PM2018-11-23T15:35:23+5:302018-11-23T15:37:22+5:30
राजेश शाह (४८) असं आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने निलंबित पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण यांच्याकडे दीड लाख रुपयाची लाच मागितली होती.
मुंबई - कालच साकीनाका पोलीस ठाण्यातील पोलिसाला पानटपरीवाल्याकडून २ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली होती. मात्र समता नगरमध्ये निलंबित पोलिसाकडूनच लाच घेतल्याची घटना घडली आहे. एका निलंबित पोलीस उपनिरीक्षकाकडून लाच घेताना कपडे व्यापाऱ्याला अटक झाली आहे. राजेश शाह (४८) असं आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने निलंबित पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण यांच्याकडे दीड लाख रुपयाची लाच मागितली होती.
राजेश शहाने चव्हाण यांच्याविरुद्ध 10,000 रुपायांची मागणी केली असल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. त्या तक्रारीनुसार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल असून त्याची चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी राजेश शहाने चव्हाण यांच्याकडे दीड लाख मागणी केल्याने चव्हाण यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होती. तसेच राजेश शहा याने २५,००० इतकी रक्कम पहिला हप्ता म्हणून मागणी करून त्यापैकी १५,००० स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडून त्याच्याविरुद्ध समता नगर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.