पाठवले दहा.. दिसले एक लाख; अदानी वीज कंपनीच्या अभियंत्याला घातला ६ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:14 AM2023-08-23T09:14:37+5:302023-08-23T09:15:57+5:30
फसवे स्क्रिनशॉट पाठवल्याने बसला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायबर ठगापासून सावध राहण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करणाऱ्या अदानी वीज कंपनीच्या ५४ वर्षीय अभियंत्यालाच भामट्यांनी टार्गेट केले आहे. शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्याचे आमिष दाखवत बिझनेस ग्रो करण्याच्या नावाखाली बँक खाते लो करण्याचा हा प्रकरणात एम. एच. बी. कॉलनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अभियंत्याची ६ लाख ६१ हजार ९२० रुपयांची फसवणूक झाली आहे.
तक्रारदाराला ६ जूनला संध्याकाळी ६.३० वाजता इन्स्टाग्राम अकाउंटवर रील्स पाहत असताना विवेक ट्रेडर नावाने जाहिरात दिसली. ज्यात भारत ट्रेड यात्रा नावाने निफ्टी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करत फायदा मिळवून देण्यासाठी सल्ला मिळेल, असे सांगण्यात आलेत. त्यावर विवेक संभाजी नाव सांगणाऱ्या व्यक्तीला मोबाइल शेअर करून संपर्क साधला. संभाजीला ५ लाख बुडाल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा संभाजीने त्यांना ग्रो ट्रेडिंग ॲपवर नवीन अकाउंट उघडा, मी तुमच्या वतीने ट्रेडिंग करेन असे सांगत १० हजार गुंतवून अजमावयाला सांगितले. गुंतवणुकीसाठी मागितलेली कागदपत्रे संबंधित गुंतवणूक कंपनीच्या कार्यालयात जाऊन जमा करतो, असे त्याला सांगितले. मात्र मी ऑनलाइन अनेकांची कागदपत्रे घेऊन त्यांचे अकाउंट तयार केले आहे, असे संभाजीने सांगितले. त्यामुळे त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच अन्य कागदपत्र संभाजीने दिलेल्या व्हॉट्सॲपवर पाठवली. तसेच त्यांच्या ईमेलवर आलेला ओटीपीही त्याच्याबरोबर शेअर केला. संभाजीने एक लिंक तयार करून तक्रारदाराला पाठवत ती क्लिक करून Groww: Stock & Mutual Fund नावाचे ॲप डाऊनलोड केले.
फसवे स्क्रिनशॉट
संभाजीने तक्रारदाराला ३ लाखांपासून २४ लाख झाल्याचे वेगवेगळे फसवे स्क्रीन शॉट पाठवत त्यांची ६ लाख ६१ हजार ९२० रुपयांची फसवणूक केली. जे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
पाठवले दहा.. दिसले एक लाख
संभाजीच्या सांगण्यावरून १२ जूनला तक्रारदाराने यूपीआयमार्फत १० हजार रुपये पाठवले. मात्र ग्रो ॲपवर १ लाख रुपये असल्याचे दाखवत होते. तक्रारदाराने त्याचा स्क्रीनशॉट संभाजीला पाठवल्यावर माझ्याकडून एक शून्य जास्त दाबला गेला असेल, असे सांगून संभाजीने थोडे थोडे पैसे मला तुम्ही पाठवा असे स्पष्ट केले. त्यांनी काही रक्कम तीन व्यवहारात पाठवली.