व्हाईटकॉलर चोर.. कारने आले आणि ट्रॉलीतून सूपरबाजारातील किराणा चोरला!
By योगेश पांडे | Published: October 25, 2023 06:02 PM2023-10-25T18:02:50+5:302023-10-25T18:03:05+5:30
सूपर बाजारातून ९३ हजारांचा किराणामाल चोरल्याची माहिती
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पांढरपेशे असल्याचा आव आणत एका कुटुंबातील सदस्यांनी चक्क रामदासपेठेतील एका सूपर बाजारातून ९३ हजारांचा किराणामाल चोरला. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी दोन कारने आले होते व तीन वेळा सूपरबाजारात जाऊन प्रत्येक वेळी ट्रॉलीतून माल बाहेर नेला. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
धापेवाडा येथील वॉर्ड क्रमांक चार येथील रहिवासी राजेश वसंतराव डोंगरे (४१), रजनी राजेश डोंगरे (४०), शुभम विठ्ठलराव आमले (२६), विकास वसंतराव डोंगरे (३२), राही विकास डोंगरे (३०) अशी आरोपींची नावे आहेत. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ते रामदासपेठेतील लॅंडमार्क बिल्डींगमधील रिलायन्स स्मार्ट बाजारात गेले. त्यांनी काही सामान घेतले व ट्रॉलीतून सामान घेऊन बाहेर गेले. काही वेळाने ते परत आले व परत थोडे सामान घेऊन बिल भरून ट्रॉली घेऊन बाहेर गेले. असा प्रकार त्यांनी तीन वेळा केला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी ट्रॉली तपासली असता त्यात बिलात नमूद केल्याव्यतिरिक्त आणखी सामान आढळून आले.
सीसीटीव्हीतून तपासणी केली असता त्यांनी अशा प्रकारे भरपूर सामान चोरल्याची बाब समोर आली. कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारणा केली असता चोरलेले सामान पार्किंगमध्ये ठेवलेल्या कारमध्ये असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांनी तो माल तपासला असता त्याची किंमत ९३ हजार ७५० रुपये इतकी होती. हे आरोपी दोन कारमधून आले होते व चोरलेले सामान कारमध्ये ठेवून ते निघण्याच्य प्रयत्नात होते. स्मार्ट बाजाराचे असिस्टंट स्टोअर मॅनेजर सचिन तडस यांच्या तक्रारीवरून पाचही आरोपींविरोधात सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून याअगोदरदेखील त्यांनी अशा प्रकारे चोरी केली आहे का याचा तपास सुरू आहे.