२ कोटींची माया जमवणारी कोण आहे अमनदीप कौर? एका कांडमुळे पोलीस खात्यातील नोकरी गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:38 IST2025-04-05T17:37:40+5:302025-04-05T17:38:13+5:30
अमनदीप कौर २०११ साली पंजाब पोलीस विभागात भरती झाली. २०१५ ला तिने लव्ह मॅरेज केले होते परंतु काही काळातच ती पतीपासून वेगळी राहू लागली

२ कोटींची माया जमवणारी कोण आहे अमनदीप कौर? एका कांडमुळे पोलीस खात्यातील नोकरी गेली
पंजाब पोलीस खात्यातील महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौर सध्या प्रचंड चर्चेत आहे. अमनदीपला पोलीस खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. ड्रग्स प्रकरणात अमनदीप कौरला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात अमनदीप कौरची लग्झरी लाईफस्टाईल समोर आली आहे. अमनदीप कौर पंजाबच्या बठिंडा येथे तैनात होती. ती सोशल मीडियात खूप सक्रीय असून तिच्या एका चष्म्याची किंमत ८५ हजार असल्याचं सांगण्यात येते.
अमनदीपच्या इन्स्टा अकाऊंटवर अनेक रिल्स व्हायरल झाले आहेत. त्यात महागड्या वस्तूची ती शौकीन दिसते. तिच्याकडे महागडे घड्याळ, कार आणि आलिशान घर असल्याचं समोर आले आहे. अमनदीप कौर बहुतांश वेळा मेडिकल सुट्टीवर असायची. ती ड्युटीवर कमी पण सुट्टी घेऊन ड्रग्स पुरवठा करायची. गेल्या १४ वर्षाच्या तिच्या कारकिर्दीत ३१ वेळा तिची बदली झाली आहे. २ वेळा तिच्यावर निलंबनाची कारवाईही झाली आहे.
अमनदीप कौर २०११ साली पंजाब पोलीस विभागात भरती झाली. २०१५ ला तिने लव्ह मॅरेज केले होते परंतु काही काळातच ती पतीपासून वेगळी राहू लागली. तिचे वडील मिस्त्रीचे काम करतात तर भाऊ खासगी कंपनीत कामाला आहे. २०२० साली अमनदीप कौरची भेट रुग्णवाहिका चालक बलविंदर सिंगसोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघांनी मिळून खाकीच्या नावाखाली ड्रग्सचा काळाबाजार सुरू केला. अमनदीप कौर आणि बलविंदर दोघे मिळून ड्रग्स तस्करी करतात असा आरोप आहे.
अमनदीपची एकूण संपत्ती २ कोटीच्या आसपास आहे. तिच्याकडे ५० लाखांचे भूखंड आहेत. आलिशान घर आणि त्यात महागडी फर्निचर आहेत. पंजाब पोलीस तिच्या संपत्तीचा तपास करत आहेत. याआधी २०२२ मध्ये फिनाइल पिऊन एसएसपी ऑफिसमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी अमनदीप कौर आणि बलविंदर यांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच तिला बठिंडा जिल्ह्यात १७.७१ ग्रॅम हिरोईन विकताना अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे ३० हजार फॉलोअर्स होते ते अटकेनंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.