कोण आहे अर्पिता मुखर्जी?; ज्यांच्या घरी ईडी कारवाईत सापडलं २० कोटींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 08:26 AM2022-07-23T08:26:07+5:302022-07-23T08:27:23+5:30
अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी हे सरकारमधील शिक्षण मंत्री आहेत.
कोलकाता - पश्चिम बंगालमधील चर्चेत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. यात जवळपास २० कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली. पार्थ चॅटर्जी यांच्या घरीही शुक्रवारी धाड टाकण्यात आली. त्यामुळे अर्पिता मुखर्जी कोण आहे त्या पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय कशा बनल्या असा प्रश्न उभा होत आहे.
ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी या बांगला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. अर्पिता मुखर्जी यांनी त्यांच्या फिल्म करिअरमध्ये साइड रोल म्हणून काम केलंय. बांगला सिनेमासोबतच ओडिया आणि तामिळ सिनेमातही त्यांनी काम केले आहे. अर्पिता मुखर्जीने बांगला सिनेमातील सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांचा लीड रोल असणाऱ्या काही सिनेमातही काम केले आहे. अमर अंतरनाड या सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. ईडीच्या कारवाईत अर्पिताच्या घरी २० कोटी रोकड सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितले.
मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय
अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी हे सरकारमधील शिक्षण मंत्री आहेत. मग पार्थ चॅटर्जी आणि सिनेमात साईड रोल करणारी अर्पिता यांची ओळख कशी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तृणमूलचे नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकातामधील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीचं नेतृत्व करतात. ही कोलकाता येथील सर्वात मोठी दूर्गा पूजा समिती आहे. अर्पिता मुखर्जी २०१९ आणि २०२० मध्ये पार्थ चॅटर्जी यांच्या दूर्गा पुजा सोहळ्यात प्रमुख चेहरा होती. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली.