चिथावणीखोर विधान केल्याने अटक झालेला मौलाना सलमान अझरी नक्की कोण? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:26 AM2024-02-05T10:26:27+5:302024-02-05T10:27:30+5:30
गुजरातच्या जुनागढमध्ये केलेल्या भाषणामुळे मौलानाला मुंबईत करण्यात आली
Maulana Mufti Salman Azhari arrested: गुजरातमधील जुनागडमध्ये चिथावणीखोर भाषण देणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला मुंबईतील घाटकोपरमध्ये रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या निषेधार्थ मौलानाचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. मात्र, काही वेळानंतर मौलानानेच पोलीस ठाण्यातून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. या दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. त्याला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली असून त्याला गुजरातला नेण्यात आले.
कोण आहे मौलाना सलमान अझरी?
- मुफ्ती सलमान अझरी हा सुन्नी इस्लामिक संशोधन अभ्यासक आणि प्रेरक वक्ता असल्याचे सांगितले जाते.
- त्याने इजिप्तच्या जामिया अल-अझहरमधून इस्लामिक अभ्यासासाठी पदवी प्राप्त केली आहे.
- जगभरात त्याचे हजारो समर्थक आणि अनुयायी आहेत. इस्लामिक विषयांवर भाषणे देण्याबरोबरच तो विविध सामाजिक-धार्मिक कार्यातही सक्रिय आहे.
- जामिया रियाझुल जन्ना, अल-अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारूल अमान या विविध संस्था व संघटनांचा तो संस्थापक आहे.
सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणात मौलाना मुफ्ती सलमान अजहरी हा कलम १५३ए, ५०५, १८८ आणि ११४ अंतर्गत आरोपी आहे. अझरीने पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित लोकांना सांगितले की, अतिउत्साहात कोणीही भान सोडू नका. परिस्थिती कशीही असो, मी तुमच्यासमोर आहे. मी गुन्हेगार नाही किंवा मला गुन्हा करण्यासाठी येथे आणले गेलेले नाही. मी तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची विनंती करतो. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर गोंधळ न घालता जागा रिकामी करा आणि शांततेने आपल्या घरी जा. पोलीस आवश्यक तपास करत असून मीही सहकार्य करत आहे.
पोलिसांनी यापूर्वीच दोन आयोजकांना अटक केली
अझरीने ३१ जानेवारीच्या रात्री जुनागढमधील मैदानावरील कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्याने एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. त्याच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर वाद निर्माण झाला होता. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवला. FIRमध्ये दोन आयोजकांचीही नावे आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर रविवारी रात्री मौलानाला अटक करण्यात आली. भाषणादरम्यान अझरी म्हणाला होता की, करबलाची शेवटची लढाई अजून बाकी आहे. काही वेळ शांतता आहे, मग मोठा आवाज होईल. त्यांनी इस्लामच्या प्रेषिताच्या शब्दांचे पालन करण्याचा आग्रह धरला आणि लब्बाक किंवा रसूलल्लाहच्या घोषणा दिल्या. त्याच्यासोबत जमावही घोषणा देत होता.