Aryan Khan Drug Case: आर्यन प्रकरणातील धुळ्याचा ‘तो’ सुनील पाटील कोण? दिवंगत गृहमंत्र्यांचा मानसपुत्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 06:31 AM2021-11-05T06:31:21+5:302021-11-05T06:31:51+5:30
Aryan Khan Drug case: मुंबईलगत समुद्रामध्ये एका क्रूझवर ड्रग्ज असल्याची टीप सॅम डिसुझा नावाच्या व्यक्तीने एनसीबीला दिल्याचे आतापर्यंत सांगण्यात आले. परंतु आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय आरोप - प्रत्यारोप होऊन हे प्रकरण अधिक चिघळल्याने सॅम डिसुझाने हात वर केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बहुचर्चित आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या धुळ्यातील सुनील पाटील नामक व्यक्तीची सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. हा सुनील पाटील नेमका कोण, हाच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
मुंबईलगत समुद्रामध्ये एका क्रूझवर ड्रग्ज असल्याची टीप सॅम डिसुझा नावाच्या व्यक्तीने एनसीबीला दिल्याचे आतापर्यंत सांगण्यात आले. परंतु आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय आरोप - प्रत्यारोप होऊन हे प्रकरण अधिक चिघळल्याने सॅम डिसुझाने हात वर केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धुळ्याच्या सुनील पाटील नामक व्यक्तिचा उल्लेख केला. त्यानंतर धुळे जिल्ह्यात तो सुनील पाटील कोण, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
धुळ्यातील एका प्रसिद्ध सुनील पाटील नामक व्यक्तीने मी ‘तो’ सुनील पाटील नसल्याचे जाहीर केले आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक सुनील पाटील आहेत. त्यामुळे हा सुनील पाटील नेमका कोण, या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्यांना मिळेनासे झाले आहे. परंतु राज्याच्या एका दिवंगत गृहमंत्र्यांचा मानसपुत्र म्हणून ओळख असलेल्या या व्यक्तीचे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध असून, तो काही वर्षांपासून धुळ्यात राहत आहे.