सत्ता कुणाचीही असो, अधिराज्य आमचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:57 AM2020-07-17T00:57:07+5:302020-07-17T00:58:23+5:30

प्रामाणिकपणाचा आव आणून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बंटी-बबलीला राजकीय नेत्यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी वाढली होती. सत्ता कुणाचीही असो आमचेच अधिराज्य चालणार, असा दावा ते करीत होते. परंतु शहर पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. रोज होत असलेल्या नवनव्या खुलाशांमुळे अनेकांवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता दिसत आहे.

Whoever has the power, the kingdom is ours | सत्ता कुणाचीही असो, अधिराज्य आमचेच

सत्ता कुणाचीही असो, अधिराज्य आमचेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रामाणिकपणाचा आव आणून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बंटी-बबलीला राजकीय नेत्यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी वाढली होती. सत्ता कुणाचीही असो आमचेच अधिराज्य चालणार, असा दावा ते करीत होते. परंतु शहर पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. रोज होत असलेल्या नवनव्या खुलाशांमुळे अनेकांवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता दिसत आहे.
बंटी-बबली शिताफीने आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवत होते. ज्यांचा पोलीस आणि प्रशासनावर वचक आहे किंवा जो चांगली मिळकत असलेल्या विभागाची कमान सांभाळतो, अशा नेत्यांना आधी ते आपल्या जाळ्यात ओढायचे. त्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून वसुली, ब्लॅकमेलिंग, जमिनीवर ताबा मिळविणे, बदली करणे, कंत्राट किंवा परवाना मिळवून देण्याचा गोरखधंदा करीत होते. दहा वर्षांपूर्वी परिवहन विभागातील अधिकाऱ्याचा आश्रय मिळाल्यानंतर ओव्हरलोडच्या वसुलीमुळे बंटी मालामाल झाला. सत्ता परिवर्तनानंतर तो रेती तस्करी, अबकारी लायसन्स किंवा कंत्राट मिळवून देण्याचे तसेच अधिकाऱ्यांची बदली करण्याचे काम करीत होता. बंटी मुख्य व्यक्तीचा खास असल्यामुळे अधिकाºयांना आपण फसविले जाणार नाही याची शाश्वती होती. पैसे दिल्यानंतर वर्षभर संबंधित अधिकारी बंटीकडे बदलीसाठी चकरा मारीत होते. काम न झाल्यामुळे मध्यस्थाने पैसे परत मागितले असता बंटीने त्यास धमकी दिली. बंटीला माहीत होते अधिकाºयाने तोंड उघडल्यास तो सुद्धा फसू शकतो. बंटीचा मानकापूर ठाण्याच्या परिसरात आलिशान बंगला आहे. हा बंगला वादग्रस्त जागेवर बांधला आहे. जमीन एका धार्मिक संस्थेच्या नावे आहे. बंटीने आपल्या प्रभावामुळे या जमिनीचा ताबा घेतला. त्याने इतर नागरिकांनाही जमीन बळकावण्यासाठी मदत केली. जमिनीचे मूळ मालक असलेल्या धार्मिक संस्थेने मानकापूर पोलीस आणि नासुप्रकडे तक्रारही केली. संस्थेचे पदाधिकारी जमिनीची माहिती घेण्यासाठी गेले असता मानकापूर पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. नासुप्रनेही तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही. बंटीच्या सांगण्यानुसार या जमिनीच्या परिसरात शासकीय निधीतून रस्ता आणि विजेचे खांब लावण्यात आले. बंटी-बबलीपासून त्रस्त असलेले नागरिक आता कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकरच्या धर्तीवर या अवैध बंगल्यावर कारवाईची मागणी करीत आहेत.

कशी झाली आर्थिक प्रगती
बंटी एकेकाळी ऑटो डीलरचे काम करीत होता. दोन-चार दुचाकींची विक्री करून तो उदरनिर्वाह चालवित होता. त्यानंतर एका नेत्याकडे त्याने सेल्समनचे काम केले. त्यावेळी तो रेशीमबागमध्ये राहत होता. एका प्रकरणात अडकल्यामुळे तो खरबी येथे राहण्यासाठी निघून गेला. अनेकांची फसवणूक करून तो मालामाल झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने लक्झरी एसयुव्ही बुक केली. कमाईचे स्थायी साधन नसताना त्याने केलेली आर्थिक प्रगती तपासाचा भाग आहे.

डॉक्टरची भूमिका महत्त्वाची
सूत्रांनुसार बंटी-बबलीच्या प्रगतीत शासकीय डॉक्टरची भूमिका महत्त्वाची आहे. तो दोघांच्या सांगण्यावरून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संपत्ती गोळा करीत होता. या डॉक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आश्रय होता. जाणकारांच्या मते त्यांच्या संबंधांचा बारकाईने तपास केल्यास अनेक धक्कादायक बाबी पुढे येऊ शकतात.

Web Title: Whoever has the power, the kingdom is ours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.