कहानी पुरी फिल्मी है....तपास सीबीआयकडे : छडा लावला पोलिसांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 09:59 PM2021-03-19T21:59:40+5:302021-03-19T22:00:01+5:30

Murder Mystry : सीबीआयला कोणतीही माहिती मिळत नाही. दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक त्याच प्रकरणाचा पोलीस छडा लावतात अन त्यातील तब्बल नऊ आरोपींना सीबीआयला सोपविले जाते.

The whole story is filmy .... Investigation to CBI: Police cracked down | कहानी पुरी फिल्मी है....तपास सीबीआयकडे : छडा लावला पोलिसांनी

कहानी पुरी फिल्मी है....तपास सीबीआयकडे : छडा लावला पोलिसांनी

Next
ठळक मुद्दे ६ सप्टेंबर २०१६ ला झालेले आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड सर्वत्र चर्चेला आले होते.  ज्या पद्धतीने हे हत्याकांड घडले आणि त्यानंतर पाच वर्षात ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या

नरेश डोंगरे

नागपूर : देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेपैकी एक मानल्या जाणाऱ्या सीबीआयकडे एखाद्या प्रकरणाचा तपास असतो. अनेक वर्षे तपास करूनही सीबीआयला त्यात कोणता धागादोरा मिळत नाही. हतबल होऊन ही तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात महत्वाची माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करते. तरीसुद्धा सीबीआयला कोणतीही माहिती मिळत नाही. दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक त्याच प्रकरणाचा पोलीस छडा लावतात अन त्यातील तब्बल नऊ आरोपींना सीबीआयला सोपविले जाते. 'कहानी पुरी फिल्मी है...' अशासारखे हे प्रकरण नागपुरात घडले. ही घडामोड आता  तपास यंत्रणांमध्ये 'मॉडल' म्हणून पुढे आली आहे.

गुन्हेगारांच्या आपसी वैमनस्यातून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करून त्यांचा खून पडण्याच्या घटना नागपुरात नेहमीच घडतात. मात्र गुन्हेगारी किंवा गुन्हेगारांशी कवडीचा संबंध नसताना एखाद्या वृद्धावर बेछुट गोळ्या झाडून सिने स्टाइल हत्या होण्याची ही पहिलीच घटना होती. त्याचमुळे ६ सप्टेंबर २०१६ ला झालेले आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड सर्वत्र चर्चेला आले होते.  ज्या पद्धतीने हे हत्याकांड घडले आणि त्यानंतर पाच वर्षात ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्या एखाद्या चित्रपटातील कथानका सारख्याच वाटत होत्या. निमगडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी तब्बल दीड ते दोन वर्षे पोलीस नुसते अंधारात चाचपडत होते. नमूद करण्यासारखी बाब अशी की, हत्याकांड सुपारी देऊन घडवून आणल्याची सर्वत्र चर्चा होती. सुपारी कशासाठी आणि कोणी दिली असेल ते संशयितही पोलिसांच्या टप्प्यात होते. त्यातल्यात्यात रंजीत सफेलकर नावाचा राजकीय घोंगडे ओढून कडक कपड्यात वावरणारा कुख्यात गुंड, त्याचा राईट हॅन्ड कालू हाटे, या गुंडांच्या सोबत सख्य असणारा शहबाज, नब्बू हे सर्वच्या सर्व पोलीसच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.  तरीसुद्धा त्यांना बोलते करण्यात आणि निमगडेच्या हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात तत्कालीन पोलीसांना यश आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एक नाट्यमय घडामोड घडली आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने दोन वर्षे या प्रकरणाचा कसून तपास केला. कोणताही धागादोरा हाती मिळत नसल्याचे पाहून सीबीआयने निमगडेच्या हत्याकांडातील आरोपी संबंधीची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपये पुरस्कार देण्याचे जाहीर केले. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही स्पष्ट केले. मात्र या पुरस्कारालाही कुणाकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट अर्थात फाईल बंद करण्याच्या मनस्थितीत सीबीआयचे अधिकारी होते. अशात नागपूरपोलिसांनी या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला. नुसता उलगडा केला नाही तर प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असलेल्या१९ पैकी ९ आरोपींना ताब्यात घेतले आणि सीबीआयकडे त्यांना सोपवले. चित्रपटात शोभेल अशीच ही घडामोड आहे. 

कुछ बात है, कुछ खास है!
तपासाचा उत्कृष्ट नमुना अन प्रशंसनीय कामगिरीचे नागपूर पोलिसांचे हे केवळ पहिलेच प्रकरण नाही. कोणताही धागादोरा नसताना अनेक प्रकरणाचा उलगडा त्यांनी यापूर्वीही केला आहे. आरोपीच नव्हे तर मृतकही अज्ञात असताना पोलिसांनी त्याचा छडा लावून आरोपींना अटक केल्याची अनेक प्रकरण आहेत.
दोन वर्षांपूर्वी एका आटो चालकाची हत्या करून, त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून आरोपींनी दोन पोत्यात ते भरले आणि हे  पोते गांधीसागर तलावात फेकून दिले होते. विशेष म्हणजे मृतक ओळखता येणार नाही, अशी तजवीज आरोपींनी केली होती. तरीसुद्धा तुकडे तुकडे जोडून नागपूरच्या गुन्हे शाखा पथकाने तपास केला आणि आरोपींना अटकही केली होती. हे प्रकरण  देशाततील सर्वोत्कृष्ट तपासाच्या प्रकरणांपैकी एक प्रकरण ठरले होते. त्यामुळे नागपूर पोलिसांचा मोठा गौरवही झाला होता. आता हे तशाच प्रकारचे दुसरे प्रकरण आहे.

पहिलेच उदाहरण
सीबीआयकडे तपास असताना त्या प्रकरणाचा स्थानिक पोलिसांनी छडा लावण्याची ही देशातील कदाचित पहिलीच ही घटना असावी, असा सूर या निमित्ताने तपास यंत्रणांमधून उमटला आहे. कुछ खास है... अशी कौतुकाची थापही नागपूर पोलिसांना मिळत आहे.

चित्रपट / मालिकेला मनोरंजक आणि थरारक बनविण्यासाठी कल्पनेच्या पलीकडचे काहीतरी बनविले जाते. म्हणूनच चित्रपटात काहीही होऊ शकते, असे म्हटले जाते. मात्र, बहुचर्चित एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीत घडलेल्या नाट्यमय घडामोडी चित्रपटातील कथानका पेक्षा कमी नाही.

Web Title: The whole story is filmy .... Investigation to CBI: Police cracked down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.